आळंदीच्या एमआयटी महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी आळंदी जवळ असणाऱ्या ठाकरवाडीच्या विकासाचा ध्यास घेतला आहे. हा संकल्प साध्य करण्यासाठी व्हिजनरी फायटर्सची २४ जणांची टीम गावातील विकासासोबतच तेथील जिल्हा परिषदेच्या शाळेतील मुलांना संगणकिय ज्ञान देण्याचे काम करत आहे. तीर्थ क्षेत्र आळंदी शेजारी असणाऱ्या ठाकरवाडी, चऱ्होली खुर्द गाव आहे. गावातील तब्बल सव्वाशे कुटुंबियांना आणि येथील शाळेला अभियांत्रिकेचे विद्यार्थी आधार देत आहेत. भारताच्या उज्वल भविष्यासाठी विद्यार्थाना चांगले शिक्षण देणे गरजेचे आहे. हेच लक्षात घेऊन गावातील मुलांना शिक्षण देण्यासाठी अभियांत्रिकी आणि वैद्यकीय विद्यार्थ्यांची धरपड सुरू आहे. गावाची प्रगती आणि विद्यार्थ्यांचा शैक्षणिक विकास हीच संकल्पना मनात रुजवून व्हिजनरी फायटर्सच्या टीमने ठाकरवाडीत पाऊल टाकले.

आळंदी हे तीर्थ क्षेत्र मानले जाते. या ठिकाणी कोट्यवधीची कामे होत आहेत. मात्र, आळंदीपासून अवघ्या तीन किलोमीटर अंतरावर असलेल्या ठाकरवाडीत गेल्यानंतर आपण कित्येक वर्षे मागे असल्याचा भास होतो. येथील परिस्थिती ही अशी असेल तर विद्यार्थ्यांच काय ? असा प्रश्न निर्माण होतो. १२५ कुटुंबे असणाऱ्या गावात ७०० पेक्षा अधिक नागरिक राहतात. या ठिकाणच्या रस्त्यांची अवस्था खराब आहे. पाण्याची सोय नाही. देशात स्वच्छता अभियान सुरु असताना या गावात शौचालये नाहीत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राबवलेल्या गॅस योजनेपासून ठाकरवाडी खूप दूर आहे. त्यामुळे येथे आल्यानंतर आपण कित्येक वर्षे पाठीमागे असल्याचा भास होतो. याच समस्येला तोंड देण्यासाठी आणि विविध सरकारी योजनांची माहिती गावातील प्रत्येक घरापर्यंत पोहचवण्यासाठी या टीम ने पुढाकार घेतला आहे. एवढेच नव्हे तर मुलांना शिक्षण देणे हा देखील या मागचा उद्देश आहे.

कौलारू घरे, शेळ्या मेंढ्या, जनावरे, गरीबी तसेच अशिक्षितपणा ही या ठिकाणची परिस्थिती आहे. सर्व ठाकर जमातीचे असल्याने यांचा पिढी जात धंदा हा मजूरी आहे. त्यामुळे यांच्या मुलांच्या शिक्षणाविषयी प्रश्न निर्माण होतो. या वाडीवर जिल्हा परिषद प्राथमिक शाळा असून ती १ ली ते ७ वी पर्यंत आहे. तब्बल २०० विद्यार्थी शिक्षण घेतात. या आधुनिक काळातील लॅपटॉप असेल किंवा इंटरनेट या सर्वांपासून हे विद्यार्थी दूर आहेत. याचा समन्वय जुळवून व्हिजनरी फायटर्स टीमधील अभियांत्रिकी आणि वैद्यकीय शिक्षण घेणारे विद्यार्थी येथील शाळेतील विद्यार्थाना लॅपटॉप आणि इंटरनेटचे धडे देत आहेत. विशेष म्हणजे ही ठाकरवाडी हागणदारी मुक्त करणे, उज्वल योजना, स्वच्छ भारत अभियान, इंदिरा आवास योजना या संदर्भात योग्य ते मार्गदर्शन करणे हाच हेतू या टीमचा आहे. गेली दीड महिने झाले हे यात गुंतलेले आहेत.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलेल्या आवाहानानंतर खासदारांनी गावं दत्तक घेतली. मात्र, त्यांचा विकास हा कागदावरच झाला. त्यामुळे व्हिजनरी फायटर्स ही टीम करत असलेला गावचा विकास आणि शाळेतील विद्यार्थाना देत असलेलं शिक्षण हे कौतुकास्पद आहे.

या उपक्रमाबद्दल ठाकरवाडीच्या शाळेतील शिक्षक चंद्रकांत रंदवे म्हणाले की, संगणक ही काळाची गरज आहे. मात्र, आमच्या शाळेतील विद्यार्थांनी संगणक आणि लॅपटॉप पाहिला नव्हता. गेल्या दीड महिन्यापासून व्हिजनरी फायटर्स ही टीम गावाचा आणि शाळेचा विकास करत आहे. ते विद्यार्थ्यांना देत असलेल्या या शिक्षणाचा विद्यार्थांना भविष्यात फायदा होईल. त्यामुळेच आम्ही अभियांत्रिकीच्या विद्यार्थांना शाळेत शिकवण्याची परवानगी दिली.