पुणे : आगामी महापालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर मतदार याद्यांच्या पडताळणीसाठी ‘बुथ लेव्हल एजंट’ नेमण्याच्या कामाची पुण्यातील स्थिती पाहून महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे (मनसे) अध्यक्ष राज ठाकरे यांचा पारा चढला आणि ते बैठकीतून निघून गेले. जाताना ‘काम करायचे नसेल, तर पदे सोडा’ असा इशारा दिल्यानंतर आता पदाधिकाऱ्यांची ‘बुथ लेव्हल एजंट’ शोधण्यासाठी धावपळ सुरू झाली आहे. अनेक दिवसांपासून पदाला चिकटून बसलेल्या मनसेचे काही पदाधिकारी ‘बुथ लेव्हल एजंट होता का?’ अशी विचारणा करत असल्याचे चित्र निर्माण झाले आहे.

मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मतदार चोरीचा उपस्थित केलेला मुद्दा, त्यासाठी महाविकास आघाडीशी केलेली संगत या पार्श्वभूमीवर मतदार याद्यांच्या पडताळणीला प्राधान्य देण्यात आले आहे. त्यासाठी ‘बुथ लेव्हल  एजंंट’ नेमून मतदार यादी अद्ययावत आहे का, याबाबत माहिती घेण्याचे आदेश गेल्या महिन्यात दिले. त्याचा आढावा घेण्यासाठी राज ठाकरे हे गेल्या आठवड्यात पुण्यात आले. प्रमुख पदाधिकारी आणि शाखाप्रमुखांच्या तयारीची अवस्था पाहून ते बैठक सोडून निघून गेले. मात्र, जाताना त्यांनी ‘काम करायचे नसेल, तर पद सोडा’ असा आदेशच दिल्याने अनेक दिवसांपासून पदांवर असलेल्या पदाधिकाऱ्यांमध्ये अस्वस्थता पसरली आहे.

नाराजी दूर करण्यात पदाधिकारी अपयशी

राज ठाकरे हे नाराज होऊन बैठकीतून बाहेर पडल्यानतंर काही पदाधिकाऱ्यांनी मुंबईत जाऊन राज ठाकरे यांची नाराजी दूर करण्याचा प्रयत्न केला. तयारी कशी सुरू आहे, हे दाखविले. मात्र, नाराजी दूर करण्यात अपयश आल्याने आता पर्याय राहिला नसल्याने ते माघारी परतले. आता ‘बुथ लेव्हल एजंट’ नेमण्याशिवाय पर्याय नसल्याचा संदेश त्यांच्याकडून देण्यात आल्याने पदाधिकाऱ्यांची धावाधाव सुरू झाली आहे.

या पदाधिकाऱ्यांंवर जबाबदारी

‘बुथ लेव्हल एजंट’ नेमण्यासाठी विधानसभा मतदारसंघनिहाय प्रमुख पदाधिकाऱ्यांवर जबाबदारी सोपविण्यात आली आहे. हडपसर विधानसभा मतदार संघाची जबाबदारी शहराध्यक्ष साईनाथ बाबर यांच्याकडे देण्यात आली आहे. वडगाव शेरी मतदार संघासाठी माजी नगरसेवक बाबू वागस्कर, कसबा मतदार संघासाठी माजी शहरध्यक्ष अजय शिंदे, कोथरुडसाठी प्रदेश सरचिटणीस हेमंत संभूस आणि गणेश सातपुते, शिवाजीनगरसाठी रणजीत शिरोळे, पुणे कॅन्टोन्मेंटसाठी बाळा शेडगे आणि खडकवासला मतदार संघासाठी किशोर शिंदे यांची नेमणूक केली आहे.

भाजपचे पन्नाप्रमुख कार्यरत, मनसेची शोधमोहीम   

निवडणुका जिंंकायच्या असतील, तर कार्यकर्ते महत्त्वाचे असतात. ते घरोघरी जाऊन मतदारांंशी संंपर्क साधणे, माहिती संकलित करणे किंवा जुनी माहिती अद्ययावत करत असतात. पूर्वी काही पक्ष एक हजार मतदारांंसाठी एक कार्यकर्त्याची नेमणूक करत असत. त्याला ‘हजारी कार्यकर्ता’ असे म्हटले जायचे. ते हजारी कार्यकर्ते हे लाेकप्रतिनिधींंचे कणा असायचे. निवडणूक सोपी आहे की अवघड, याचा हजारी कार्यकर्त्याच्या मतावर अंदाज बांधला जात असे. आता अनेक पक्षांनी ही पद्धत मोडीत काढल्यासारखी स्थिती आहे. सध्या काही मोजकेच पक्ष या हजारी यंत्रणेचा अवलंब करताना दिसून येतात. भाजपने प्रत्येक बुथमागे २५ जण हे पन्नाप्रमुख म्हणून नेमले आहेत. ते नेहमीच कार्यरत असतात. मात्र, मनसेचे पदाधिकारी हे निवडणुका जवळ आल्या असताना ‘बुथ लेव्हल एजंट’ शोधत असल्याचे चित्र निर्माण झाले आहे.