वाढता विस्तार आणि मोबाईल कनेक्टिव्हिटी लक्षात घेता शहरात किमान एक हजार मोबाईल टॉवर्सची आवश्यकता आहे. मोबाईल टॉवर्सना मान्यता मिळावी यासाठी पंधराशे अर्ज महापालिकेकडे आले असून डिसेंबर अखेपर्यंत साडेतीनशे मोबाईल टॉवर्सच्या उभारणीला महापालिका प्रशासनाकडून मान्यता देण्यात आली आहे.

मोबाईल ग्राहकांची देशातील वाढती संख्या आणि मोबाईलधारकांना विनातक्रार सेवा पुरविण्यासाठी देशभरात किमान एक लाख नव्या टॉवर्सची आवश्यकता असल्याचे मत सेल्युलर ऑपरेटर असोसिएशन ऑफ इंडियाचे (सीओएआय) महासंचालक राजन मॅथ्यूज यांनी व्यक्त केले होते. या पाश्र्वभूमीवर देशातील माहिती तंत्रज्ञानाच्या क्षेत्रातील महत्त्वाचे शहर असलेल्या पुण्यातील मोबाईल टॉवरचा आढावा घेतला असता मोबाईल कंपन्यांच्या काही प्रतिनिधींनी शहरात किमान एक हजार ते बाराशे टॉवर्सची आवश्यकता असल्याचे सांगितले. महापालिका प्रशासनाकडून डिसेंबर अखेपर्यंत साडेतीनशे टॉवर्सच्या उभारणीला मान्यता देण्यात आल्याचे स्पष्ट करण्यात आले.

शहरात विविध खासगी मोबाईल कंपन्यांकडून सेवा पुरविण्यात येत आहेत. त्यासाठी मोबाईल टॉवर्स उभारण्याची परवानगी त्यांना महापालिकेकडून देण्यात आली आहे. शहरातील अधिकृत टॉवर्सची संख्या सद्य:स्थितीत दोन हजार दोनशेतीस एवढी आहे. हे सर्व टॉवर्स मिळकत कराच्या कक्षेत आहेत. शहरात या टॉवर्स उभारणीला महापालिकेच्या बांधकाम विभागाकडून मान्यता देण्यात येते. तसेच विविध विभागांचा अभिप्रायही घेण्यात येतो. त्यानुसार बांधकाम विभागाकडे गेल्या काही महिन्यांपासून पंधराशे अर्ज दाखल झाले आहेत. त्यापैकी ३५० टॉवर्सच्या उभारणीला मान्यता देण्यात आली आहे.

महापालिका प्रशासनाकडे मंजुरीसाठी आलेल्या अर्जाची संख्या मोठी असली तरी त्यामध्ये नव्याने परवानगी मागणाऱ्या अर्जाबरोबरच नूतनीकरणासाठी आलेले अर्ज, मोबाईल टॉवर्सला मान्यता देण्यासंदर्भात राज्य शासनाने सन २०१४ मध्ये काढलेल्या परिपत्रकानुसार मान्यतेसाठी आलेले अर्ज यांचाही समावेश असल्याचे सांगण्यात आले.

मोबाईल कंपन्यांमध्ये सेवा पुरविण्याची स्पर्धा असते. त्यामुळे एखाद्या कंपनीकडून भविष्यात टॉवर्स उभारण्याचे नियोजन करण्यात येते त्यानुसारच स्पर्धक कंपन्यांकडूनही तेवढेच टॉवर उभारण्याचे नियोजन करण्यात येते. शहरात किमान चार ते पाच मोठय़ा मोबाईल कंपन्यांचे जाळे आहे.

शहराचा वाढता विस्तार, मोबाईल ग्राहकांची वाढती संख्या ही बाब लक्षात घेऊन एक हजार ते बाराशे टॉवर्सची पुढील एक वर्षांच्या कालावधीत आवश्यकता असल्याचे मोबाईल कंपन्यांच्या प्रतिनिधींकडून सांगण्यात आले. दरम्यान, रिलायन्स जीओ आणि इंडस या कंपन्यांना तीनशे चौऱ्याण्णव टॉवर्स उभारणीसाठी मान्यता देण्याचा प्रस्ताव होता. तो महापालिकेच्या स्थायी समितीसह मुख्य सभेनेही मान्य केला आहे.