ग्वाल्हेर घराण्याचे ज्येष्ठ गायक आणि संगीत गुरू पं. मोहनराव कर्वे (वय ८९) यांचे वृद्धापकाळाने गुरुवारी दुपारी निधन झाले. त्यांच्यामागे पत्नी, तीन मुली आणि सून असा परिवार आहे. प्रसिद्ध गायिका मंजिरी कर्वे-आलेगावकर या त्यांच्या कन्या होत. पं. मोहनराव कर्वे यांच्या पार्थिवावर वैकुंठ स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले.
पं. मोहनराव कर्वे यांचा जन्म १६ सप्टेंबर १९२५ रोजी झाला. वडिलोपार्जित पीठगिरणीचा व्यवसाय सांभाळून त्यांनी आपले जीवन संगीत सेवेसाठी वाहून घेतले. वयाच्या सहाव्या वर्षी ‘सरस्वती सिनेटोन’च्या ‘भक्त प्रल्हाद’ चित्रपटात त्यांनी भक्त प्रल्हादची भूमिका साकारली होती. मात्र, चित्रपटापेक्षाही त्यांचे सूर संगीताशी जुळले. गायनाचार्य पं. रामकृष्णबुवा वझे, हरिभाऊ घांग्रेकर आणि गानकलानिधी मा. कृष्णराव यांचा सांगीतिक सहवास आणि मार्गदर्शन मोहनरावांना लाभले. गांधर्व महाविद्यालयाची ‘संगीत अलंकार’ पदवी संपादन करणारे ते पहिले गायक ठरले. आकाशवाणीचे ते मान्यताप्राप्त गायक होते.
पं. मोहनराव कर्वे यांचा पं. जसराज पुरस्कार, पं. रामकृष्णबुवा वझे स्मृती संगीत शिक्षक पुरस्कार, पं. विष्णू दिगंबर पलुस्कर पुरस्कार आणि आबासाहेब मुजुमदार पुरस्कार अशा पुरस्कारांनी गौरव करण्यात आला होता. शारदा ज्ञानपीठम संस्थेतर्फे ऋषीतुल्य गुरू आणि मित्र फाउंडेशनतर्फे त्यांचा सन्मान करण्यात आला होता. पं. मोहनराव कर्वे यांनी मंजिरी कर्वे-आलेगावकर, प्रियल साठे, वर्षां तेंडुलकर, जुई टेंभेकर, शेखर महाजन, आनंद पारखी, संवादिनीवादक कुमार करंदीकर आणि चैतन्य कुंटे असे शिष्य घडविले.
संग्रहित लेख, दिनांक 9th Jan 2015 रोजी प्रकाशित
पं. मोहनराव कर्वे यांचे निधन
ग्वाल्हेर घराण्याचे ज्येष्ठ गायक आणि संगीत गुरू पं. मोहनराव कर्वे (वय ८९) यांचे वृद्धापकाळाने गुरुवारी दुपारी निधन झाले.
First published on: 09-01-2015 at 03:07 IST
Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Mohan karve passed away