पुणे :  उत्तरतालिका तयार करण्याच्या प्रचलित पद्धतीमुळे निकाल प्रक्रियेस विलंब होत असल्याची बाब महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या निदर्शनास आली आहे. त्यामुळे उत्तरतालिकेवरील उमेदवारांचे आक्षेप प्रचलित ऑफलाइन पद्धतीऐवजी ऑनलाइन पद्धतीने घेण्याचा निर्णय एमपीएससीने घेतला असून, एमपीएससीच्या या निर्णयामुळे भरती प्रक्रिया वेगवान होऊ शकणार आहे. 

एमपीएससीकडून विविध शासकीय पदांसाठीची भरती प्रक्रिया राबवली जाते. त्यात परीक्षा झाल्यावर एमपीएससीकडून उत्तरतालिका प्रसिद्ध करून उमेदवारांकडून हरकती मागवल्या जातात. मात्र ही प्रक्रिया वेळखाऊ असल्याबाबत उमेदवारांकडून सातत्याने नाराजी व्यक्त करण्यात आली आहे. तसेच पूर्व आणि अंतिम परीक्षा, उत्तरतालिका आणि निकाल यात जाणारा वेळ कमी करण्याची मागणीही उमेदवारांकडून केली जात आहे. या पार्श्वभूमीवर उत्तरतालिकेवरील उमेदवारांचे आक्षेप ऑनलाइन पद्धतीने नोंदवण्याचा निर्णय एमपीएससीने घेतला आहे. गेल्या काही महिन्यात एमपीएससीकडून कार्यपद्धतीमधील सुधारणांबाबत काही महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आले आहेत. त्यात आता उत्तरतालिकेवर ऑनलाइन पद्धतीने आक्षेप नोंदवण्याच्या सुविधेचीही भर पडत आहे. त्यामुळे आता पदभरती प्रक्रिया प्रक्रिया वेगवान होण्यास मदत होऊ शकणार आहे.

आयोगाकडून राबवली जाणारी भरती प्रक्रिया अधिकाधिक पारदर्शक आणि विश्वासार्ह असावी यासाठी काही उपाय करण्यात येतात. प्रत्येक परीक्षेच्या दोन उत्तरतालिका प्रसिद्ध करणे हा त्याचाच एक भाग आहे. उत्तरतालिका तयार करण्याच्या प्रचलित पद्धतीमुळे निकाल प्रक्रियेस विलंब होत असल्याची बाब आयोगाच्या निदर्शनास आली आहे. त्यामुळे उत्तरतालिकेवरील उमेदवारांचे आक्षेप प्रचलित ऑफलाईन पद्धतीऐवजी ऑनलाईन पद्धतीने घेण्याचा निर्णय आयोगाने घेतला आहे.  त्यासाठीची तांत्रिक तयारी अंतिम टप्प्यात आहे. आगामी काळात उत्तरतालिकेवरील आक्षेप ऑनलाइन पद्धतीने सादर करण्याची सुविधा उमेदवारांना उपलब्ध करून देण्यात येणार आहे. या निर्णयामुळे निकाल प्रक्रिया कमी वेळात पूर्ण करणे शक्य होईल, अशी माहिती एमपीएससीकडून देण्यात आली.

प्रगत तंत्रज्ञानाचा अधिकाधिक वापर करून कमीत कमी कालावधीत निकाल प्रक्रिया पूर्ण करण्यास आयोगाकडून प्राधान्य दिले जात आहे. त्याचाच एक भाग म्हणून उत्तरतालिकेवरील आक्षेप आता ऑनलाइन पद्धतीने मागवण्यात येतील. आयोगाच्या ऑनलाइन अर्ज प्रणालीच्या संकेतस्थळावरील उमेदवारांना त्यांच्या खात्याद्वारे उत्तरतालिकेवरील हरकती नोंदवता येतील.         

– सुनील अवताडे, सहसचिव, एमपीएससी