करोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता येत्या रविवारी होणारी  महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची दुय्यम सेवा अराजपत्रित गट ‘ब’ची संयुक्त पूर्वपरीक्षा पुढे ढकलण्याचा निर्णय  मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या सर्वपक्षीय नेत्यांच्या बैठकीत घेण्यात आला.

राज्यातील करोना स्थिती लक्षात घेऊन या परीक्षेच्या नवीन तारखा  लोकसेवा आयोगाकडून लवकरच घोषित केल्या जातील, असे मुख्यमंत्र्यांनी यावेळी सांगितले. राज्यात करोना रुग्णांची संख्या वेगाने वाढत  असल्याने विद्यार्थ्याची सुरक्षितता लक्षात घेऊन आणि विद्यार्थी आणि विविध राजकीय पक्षांचे यासंदर्भातील  मत आणि मागण्या विचारात घेऊन हा निर्णय एकमताने घेण्यात आला आहे.

ही परीक्षा पुढे ढकलल्याने परीक्षार्थी विद्यार्थ्याचे कोणतेही नुकसान होणार नाही, तसेच परीक्षा अर्ज भरताना  विद्यार्थ्याचे वय गृहित धरले जाणार, असल्याने वयाची ही अडचण येणार नसल्याचे बैठकीत स्पष्ट करण्यात आले.

या आधी गेल्या महिन्यात १४ मार्चला होणारी राज्य सेवा पूर्वपरीक्षा दोन दिवस आधी रद्द करूनती पुन्हा घेण्याचा निर्णय आयोगाने घेतला होता, त्याविरोधात रस्त्यावरुन उतरून विद्यार्थ्यानी आंदोलन केले होते.  मुख्यमंत्री ठाकरे यांनी त्याची दखल घेऊन आठवड्याभरात परीक्षा घेण्याचे आश्वाासन दिल्याने विद्यार्थ्यानी आंदोलन थांबविले. त्यानंतर आयोगाने पुढील आठवड्यात २१ मार्चला परीक्षा घेतली व ती सुरळीत पार पडली. आता रविवारी होणारी परीक्षाही पुढे ढकलण्याचा दोन दिवस आधी निर्णय घेण्यात आला आहे. त्यावरही विद्यार्थ्याच्या संमिश्र प्रतिक्रिया व्यक्त होत आहेत.