हवेली तालुक्यातील नांदोशी गावचे माजी सरपंच अर्जुन विठोबा घुले (वय ५९) यांचा गुरुवारी दुपारी धायरी येथे पूर्ववैमनस्यातून गोळ्या झाडून व शस्त्रांनी वार करून खून करण्यात आला. या घटनेमुळे धायरी भागामध्ये दहशतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
घुले हे गुरुवारी दुपारी त्यांच्या मोटारीतून नांदोशीवरून पुण्याकडे निघाले होते. रस्त्यामध्ये धायरी येथे बांधकाम सुरू असलेल्या उड्डाणपुलाखाली मोटार उभी करून ते मोबाइल दुरुस्त करण्यासाठी गेले. मोटारीजवळ परत येत असताना दबा धरून बसलेल्या हल्लेखोरांनी त्यांच्यावर हल्ला केला. हल्लेखोरांनी गोळ्या झाडण्याबरोबरच घुले यांच्या डोक्यावर व छातीवर धारदार शस्त्रांनी वार केले. घुले जखमी होऊन खाली कोसळल्यानंतर हल्लेखोर शस्त्रे व पिस्तूल घटनास्थळीच टाकून पसार झाले. नागरिकांनी या घटनेबाबत पोलिसांना माहिती दिली. त्यानंतर घुले यांना रुग्णालयात हलविण्यात आले. मात्र, उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला.
घुले यांच्यावर यापूर्वी २०११ मध्ये गोळीबार झाला होता. त्यातून ते बचावले होते. घुले हे राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यकर्ते होते. राष्ट्रवादीचेच कार्यकर्ते असलेले अप्पा आखाडे यांच्यावर घुले यांच्या नातूने २०१२ मध्ये एका एस्टेट एजंटच्या कार्यालयात गोळीबार केला होता. या वैमनस्यातूनच हा हल्ला झाला असावा, असा संशय पोलिसांकडून व्यक्त होत आहे.
घटनेची माहिती मिळताच पोलीस उपायुक्त रामनाथ पोकळे, सहायक पोलीस आयुक्त राजेंद्र भामरे, प्रसाद हसबनीस, आत्मचरण शिंदे, वरिष्ठ पोलीस निरीक्षक सतीश गोवेकर घटनास्थळी दाखल झाले. घटनास्थळी दोन पिस्तूल, दोन जिवंत काडतूस, एक कोयता, दोन चॉपर व शस्त्रे ठेवण्यासाठी वापरलेली बॅग पोलिसांना मिळाली. घटनास्थळी मिळालेल्या वस्तूंवरून श्वानपथकाने काही अंतरापर्यंत माग काढला. पोलिसांनी आरोपींचा शोध सुरू केला असून, लवकरच आरोपी हाती लागतील, असा विश्वास पोलिसांनी व्यक्त केला आहे. घुले सुमारे १५ वर्षे सरपंच होते. त्यांच्यावरही खून, मारामारी व दंगलीचे गुन्हे दाखल आहेत.