तळजाई टेकडीवर मैत्रिणीसमवेत फिरण्यासाठी गेलेल्या युवकाचा हल्लेखोरांनी धारदार शस्त्रांनी वार करून निर्घृण खून केला. या प्रकारामुळे तळजाई परिसरात फिरायला आलेले नागरिक भयभीत झाले होते.साहिल चांगदेव कसबे (वय १९, रा. अप्पर इंदिरानगर) असे खून झालेल्या युवकाचे नाव आहे. त्याच्यावर हल्ला केलेल्या संशयितांची नावे समजली असून, पोलीस त्यांच्या मागावर आहेत. सहकारनगर पोलीस ठाण्यात याप्रकरणी खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. साहिल त्याच्या मैत्रिणीसोबत फिरायला टेकडीवर गेला होता.
हेही वाचा >>>पिंपरीः कचरा विलगीकरण न करणाऱ्या नागरिकांवर दंडात्मक कारवाई; अतिरिक्त आयुक्तांचे आदेश




त्यावेळी दुचाकी वाहनावरून आलेल्या टोळक्याने त्याला हटकले. काही वेळातच या टोळक्याने त्याच्यावर सशस्त्र हल्ला चढवला. अंगावर प्रत्येक ठिकाणी शस्त्राचे वार झाल्याने साहिल जागीच रक्ताच्या थारोळ्यात कोसळला. या प्रकाराने घाबरलेल्या त्याच्या मैत्रिणीने काही वेळाने साहिलच्या मित्रांना घटनास्थळी बोलावून घेतले. त्यांनी साहिलला जवळच्या रुग्णालयात नेले. मात्र, उपचारापूर्वीच त्याचा मृत्यू झाला होता.हल्लेखोर तरुण निघून गेल्यावर सहकारनगर पोलीस ठाण्याचे पथक घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी पंचनामा केला. संशयित आरोपींच्या नावांची माहिती घेतली. त्यानुसार पोलिसांची पथके आरोपींच्या शोधासाठी रवाना करण्यात आली आहेत.