scorecardresearch

नाना पाटेकर यांनी केलं अजित पवारांचं कौतुक; म्हणाले, “ते इमानाने गुपचूप काम….”

अमोल कोल्हे हे अभिनेते आहेत, त्यांनी कोणती भूमिका करायची हा त्यांचा वैयक्तिक प्रश्न आहे, असंही नाना पाटेकर म्हणाले.

सिनेअभिनेते नाना पाटेकर यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांची भेट घेतली. त्यानंतर प्रसार माध्यमाच्या प्रतिनिधीं सोबत त्यांनी संवाद साधला. यावेळी त्यांनी अमोल कोल्हे यांनी नथुराम गोडसेची भूमिका साकारण्यावरून सुरू झालेल्या वादावर प्रतिक्रिया दिली. तसेच कोविडचे नियम सर्वांनी पाळायला हवे, असे आवाहन केले. कोविडच्या काळात नाती समजली. करोनाने सर्वांना जमिनीवर आणलं, सरकार तर आहेच, पण सर्वांनी स्वतःहून प्रयत्न करणे गरजेचे आहे, असं नाना पाटेकर म्हणाले.

अजित पवारांचं कौतुक…

“अजित पवार हा माणूस जितके काम करतो त्याची जाहिरात कधी करत नाही. इमानाने गपचूप काम करत राहतो. एखादी कुठली तरी चुकीची गोष्ट असेल तर तेवढीच अधोरेखित करता तुम्ही त्यांनी केलेलं काम समोर आणा, तो खरंच चांगला नेता आहे. राजकारणी लोकांनी केलेल्या कामाला प्रसिद्धी मिळत नाही, आम्हाला अधिक प्रसिद्धी मिळते. पक्ष बदलणाऱ्या माणसाला पाच वर्षे कोणतेही पद देऊ नका,  मग कोणीही पक्ष बदलणार नाही. काहीतरी नियम असायला हवे, किमान शिक्षणाची अट हवी,” असं नाना पाटेकर म्हणाले.

अमोल कोल्हेंनी कोणती भूमिका करायची हा त्यांचा वैयक्तिक प्रश्न…

“अमोल कोल्हे हे अभिनेते आहेत, त्यांनी कोणती भूमिका करायची हा त्यांचा वैयक्तीक प्रश्न आहे. तीस वर्षांपूर्वी मीही गोडसेंची भूमिका केली. मी भूमिका केली म्हणजे मी त्यांचं समर्थन करतो का? समर्थन केले असेल तर तुम्ही प्रश्न विचारू शकता. मला विचारलं तुम्ही गोडसेची भूमिका का केली? ते माझं उपजीविकेचे साधन, यात माझी काय चूक आहे का? प्रत्येक गोष्टीचं भांडवल करायची गरज नाही. शिवाजी महाराजांची भूमिका केली त्यावेळी तुम्ही त्यांना का विचारले नाही, ही भूमिका का केली? त्यावेळी कलाकार म्हणून कोल्हे यांना मान्य केलं, मग इथे का नाही,” असा सवाल त्यांनी केला.

किरण माने प्रकरणावर प्रतिक्रिया…

“आजूबाजूला काय चुकीचं चाललंय याचं मला काही देणे घेणे नाही. मी माझं काम करत राहणे, माझी राजकीय भूमिका कशासाठी असावी? समाजाप्रती भूमिका काय? ते महत्त्वाचे, काम करत राहायचं आणि एक दिवस कापरासारखं विरून जायचं,” असं नाना पाटेकर म्हणाले.

लता दीदी लवकर बऱ्या होतील…

त्यांनी आपलं आयुष्य खूप सुंदर केलंय, त्या लवकरच बऱ्या होतील, असं ते म्हणाले.

मराठीतील सर्व पुणे ( Pune ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Nana patekar praised ajit pawar his reaction on amol kolhe kiran mane hrc 97 svk