पुणे शहरात दुचाकी आणि चार चाकींसाठी पे अॅन्ड पार्क योजना लागू करण्याचे जोरदार प्रयत्न सत्ताधारी काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसकडून सुरू झाले आहेत. या संबंधीचा प्रस्ताव अंतिम निर्णयासाठी मंगळवारी बहुमताने महापालिकेच्या मुख्य सभेकडे पाठवण्यात आला. या योजनेला मनसे, भाजप आणि शिवसेनेने विरोध केला आहे. ही योजना यापूर्वी एकमताने फेटाळलेली असतानाही ती पुन्हा लागू करण्याचा घाट सत्ताधाऱ्यांनी घातल्याचे मंगळवारी स्पष्ट झाले.
शहरातील काही रस्त्यांवर सध्या चार चाकी वाहनांसाठी पे अॅन्ड पार्क योजना लागू आहे. मात्र, वाहतूक पोलिसांनी दिलेल्या एका पत्राचा आधार घेऊन महत्त्वाच्या पंधरा रस्त्यांवर ही योजना चार चाकींसह दुचाकींनाही लागू करण्याचा प्रस्ताव महापालिका प्रशासनातर्फे स्थायी समितीपुढे ठेवण्यात आला होता. लक्ष्मी, बाजीराव, टिळक, शिवाजी, शास्त्री, कर्वे, जंगलीमहाराज, फग्र्युसन, मॉडर्न महाविद्यालय, नेहरू, बाणेर, पौड, गणेशखिंड, कर्नल तारापोर आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर रस्ता या पंधरा रस्त्यांवर ही योजना लागू करण्याचा घाट घालण्यात आला आहे. दुचाकींना पहिल्या तासाला तीन रुपये व पुढील प्रत्येक तासाला पाच रुपये आणि चार चाकींना दर तासाला दहा रुपये शुल्क आकारण्याचा प्रस्ताव आहे.
निर्णयासाठी हा प्रस्ताव स्थायी समितीपुढे आल्यानंतर समितीने त्यावर कोणताही निर्णय न घेता तो अंतिम निर्णयासाठी पक्षनेत्यांकडे पाठवला होता. पक्षनेत्यांनीही त्यावर कोणताही निर्णय न घेता प्रस्तावावरील अंतिम निर्णय मुख्य सभेने करावा, असा निर्णय घेऊन प्रस्ताव पुन्हा स्थायी समितीकडे पाठवला. समितीपुढे मंगळवारी हा प्रस्ताव आल्यानंतर मनसेचे किशोर शिंदे, भाजपचे हेमंत रासने आणि शिवसेनेचे पृथ्वीराज सुतार यांनी त्याला जोरदार विरोध केला. वाहतूक सुविधा देणे, पार्किंगसाठी जागा उपलब्ध करून देणे, सार्वजनिक वाहतूक सक्षम करणे ही महापालिकेची कर्तव्य आहेत. त्यांची पूर्तता न करता वाहनचालकांकडून पार्किंगसाठी शुल्क आकारण्याचा निर्णय नागरिकांवर अन्याय करणारा आहे, असे विरोधकांचे म्हणणे होते.
विरोधकांनी आक्रमक पवित्रा घेतल्यानंतर सत्ताधाऱ्यांनी सावध पवित्रा घेऊन या प्रस्तावावर अंतिम निर्णय मुख्य सभेने करावा, अशी सूचना केली. मात्र, मुख्य सभेकडे प्रस्ताव पाठवण्याची गरज नाही. तो फेटाळून लावा, अशी मागणी विरोधकांनी केली. अखेर मतदान घेण्यात आले आणि प्रस्ताव मुख्य सभेकडे पाठवण्याचा निर्णय सात विरुद्ध सहा अशा मतांनी मंजूर झाला. मुख्य सभेत हा प्रस्ताव मंजूर झाल्यास शहरात ही योजना लागू होऊ शकते.
प्रस्ताव राष्ट्रवादीनेच फेटाळला होता
यापूर्वीही संपूर्ण शहरात ही योजना लागू करण्यात आली होती. मात्र, मुख्य सभेने ती एकमताने फेटाळली होती. तत्कालीन महापौर मोहनसिंग राजपाल यांनी योजना तातडीने बंद करण्याचा आदेश मुख्य सभेतच प्रशासनाला दिला होता. त्याच राष्ट्रवादी काँग्रेसकडून आता मात्र पे अॅन्ड पार्कसाठी जोरदार प्रयत्न सुरू आहेत.
दादांचा आदेश; काँग्रेसचा मदतीचा हात
पुणे शहरात पे अॅन्ड पार्क योजना लागू करण्याबाबत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी वेळोवेळी आग्रह धरला असून त्यांच्या आदेशाची पूर्ती करण्यासाठी काँग्रेसने मदतीचा हात पुढे केल्याचे चित्र महापालिकेत पाहायला मिळत आहे.
पंधरा रस्त्यांवर पे अॅन्ड पार्क
दुचाकींना पाच रुपये तास
चार चाकींना दहा रुपये तास