स्थानिक नेत्यांमुळेच पक्षाची हानी होत आहे. काम न करणाऱ्यांना पक्षात पदे दिली जात आहेत. वैयक्तिक स्तोम पक्षात वाढत आहे. त्यामुळे सर्वसामान्य कार्यकर्ता पक्षापासून दुरावला आहे. विधानसभा निवडणुकीपूर्वी तरी पक्षाच्या कार्यपद्धतीबाबत विचार करा, अशी थेट टीका राष्ट्रवादीच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांनी आणि विधानसभा मतदारसंघांच्या अध्यक्षांनी शुक्रवारी पक्षाध्यक्ष शरद पवार यांच्यासमोर केली.
लोकसभा निवडणुकीतील पराभवाची दखल घेत राष्ट्रवादीने स्थानिक पदाधिकाऱ्यांची मते ऐकून घेण्याचा कार्यक्रम सुरू केला असून त्यासाठीच्या बैठका मुंबईत सुरू आहेत. पक्षाचे अध्यक्ष शरद पवार तसेच प्रदेशाध्यक्ष भास्कर जाधव यांची प्रमुख उपस्थिती या बैठकांमध्ये आहे. पुण्यातील पदाधिकारी व काही प्रमुख कार्यकर्त्यांची बैठक शुक्रवारी बोलावण्यात आली होती. या वेळी शहर आणि जिल्ह्य़ातील पदाधिकाऱ्यांनी पक्षाच्या नेत्यांवर थेट टीका केली. त्यांच्या कार्यपद्धतीबाबत वरिष्ठ नेत्यांनी गांभीर्याने विचार करावा, असेही बैठकीत स्पष्टपणे सांगितले जात होते.
शहर व जिल्ह्य़ातील राजकीय परिस्थितीबाबत तसेच पक्षाच्या स्थितीबाबत आम्ही वेळोवेळी सूचना देत होतो. मात्र, नेत्यांनी ते गांभीर्याने घेतले नाही. त्यामुळे पक्षाचा तोटा झाला. स्थानिक नेत्यांची कार्यपद्धती बदलत नाही. त्यामुळे कार्यालय ओस पडत आहे. जे काम करत नाहीत त्यांनाही पदे दिली गेली आहेत. पक्षाची ताकद वाढवण्यासाठी कार्यकर्त्यांना पुन्हा संघटित करावे लागेल, अशीही मते बैठकीत व्यक्त करण्यात आली.
मुख्यमंत्रिपदासाठी साहेबांचेच नाव जाहीर करा
बैठकीत आगामी विधानसभा निवडणुकीबाबतची चर्चा सुरू असताना पुण्यातील एका पदाधिकाऱ्याने केलेल्या सूचनेमुळे उपस्थित सारे जण अवाक झाले. विधानसभा निवडणुकीला सामोरे जाताना पवार साहेबांचेच नाव जाहीर करून आपण प्रचारात उतरले पाहिजे, अशी सूचना या वेळी करण्यात आली. या सूचनेमुळे त्याबाबतची मोठीच चर्चा उपस्थितांमध्ये बैठकीनंतर सुरू झाली.
संग्रहित लेख, दिनांक 7th Jun 2014 रोजी प्रकाशित
विधानसभेपूर्वी आपल्या कार्यकर्त्यांना संघटित करा
विधानसभा निवडणुकीला सामोरे जाताना पवार साहेबांचेच नाव जाहीर करून आपण प्रचारात उतरले पाहिजे, अशी सूचना या वेळी करण्यात आली.

First published on: 07-06-2014 at 02:50 IST
Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Ncp meeting mobilisation sharad pawar