scorecardresearch

Premium

लोकसभा निवडणुकांसाठी राष्ट्रवादीच्या उमेदवारांची यादी महिनाभरात

लोकसभेच्या उमेदवारांची राष्ट्रवादी काँग्रेसच्या उमेदवारांची यादी महिनाभरात जाहीर केली जाईल, असे राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी हिंजवडी येथे पक्षाच्या निवडणूकपूर्व बैठकीत जाहीर केले.

लोकसभा निवडणुकांसाठी राष्ट्रवादीच्या उमेदवारांची यादी महिनाभरात

बहुजन समाज पार्टीच्या मायावती व समाजवादी पक्षाचे मुलायम सिंग यांनी लोकसभेच्या उमेदवारांची यादी वर्षभरापूर्वीच जाहीर केली आहे. त्याचप्रमाणे राष्ट्रवादी काँग्रेसच्या उमेदवारांची यादी महिनाभरात जाहीर केली जाईल, असे राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी हिंजवडी येथे पक्षाच्या निवडणूकपूर्व बैठकीत जाहीर केले.
उपमुख्यमंत्री अजित पवार, विधान सभेचे सभापती दिलीप वळसे पाटील, प्रदेशाध्यक्ष भास्कर जाधव, कार्याध्यक्ष जितेंद्र आव्हाड, खासदार सुप्रिया सुळे, वंदना चव्हाण, महापौर मोहिनी लांडे, वैशाली बनकर, आमदार विलास लांडे, लक्ष्मण जगताप, अण्णा बनसोडे, वल्लभ बेनके, दिलीप मोहीते पाटील, अनिल भोसले, म्हाडाचे अध्यक्ष अंकुश काकडे, पक्षाचे प्रदेश उपाध्यक्ष वसंत वाणी, पिंपरी-चिंचवड शहराध्यक्ष योगेश बहल आदी उपस्थित होते.
पवार म्हणाले की, लोकसभेच्या जागा वाटपाबाबत येत्या सोमवारी (१२ ऑगस्ट) मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री आणि प्रदेशाध्यक्षांची प्राथमिक बठक होणार आहे. या महिनाअखेरीस कोणी-कोणत्या जागा लढवाव्यात याबाबतचा निर्णय होईल. त्यानंतर पुढील महिन्याच्या १० तारखेपर्यंत उमेदवारांची नावे अंतिम केली जातील. बसपाच्या मायावती, सपाचे मुलायम सिंग यांनी वर्षभरापूर्वीच खासदारकीच्या उमेदवारांची यादी जाहीर केली आहे. आपल्यालाही त्याच मार्गाने जावे लागणार आहे.
पुणे जिल्ह्यातील शिरूर, मावळ आणि बारामती लोकसभा मतदारसंघात राष्ट्रवादीचा उमेदवार निवडून येण्यासाठी सर्वच कार्यकर्त्यांनी प्रयत्नांची पराकाष्ठा केली पाहिजे. काही झाले तरी या तीन जागा जिंकायलाच हव्यात. काँग्रेस-राष्ट्रवादीचा २६-२२ जागांचा फॉम्र्युला निश्चित असून काही जागांची आदला-बदल होऊ शकते. रायगडची जागा राष्ट्रवादीसाठी अनुकूल असून त्याच जागेवर आपला उमेदवार निवडून येऊ शकतो, अशी कार्यकर्त्यांची भावना आहे. राष्ट्रवादी काँग्रेस महाराष्ट्राचे चित्र बदलेल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.
आदिवासी, गोरगरीब, इतर मागासवर्गीयांसाठी राज्य घटनेत तरतूद करण्यात आली आहे. या घटकांच्या आरक्षणाला कोणताही धक्का न लावता आíथकदृष्टय़ा मागासवर्गीयांना आरक्षण मिळावे अशी राष्ट्रवादीची भूमिका आहे. त्यात ब्राह्मण, मराठा समाज असला तरी त्याला आपला आक्षेप नाही. मात्र जातीनिहाय आरक्षणाला आपला विरोध कायम असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
अनधिकृत बांधकामे एका रात्रीमध्ये होत नाहीत. पाच-पाच मजली अनधिकृत बांधकामे होतात तेव्हा प्रशासन दुर्लक्ष करते. त्यानंतर अशा बांधकामांवर कारवाई करणे योग्य नाही. अनधिकृत बांधकामांबाबत धोरण ठरणे गरजेचे आहे. मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांनी या प्रकरणात लक्ष घालावे. यामागील काळात झालेल्या अनधिकृत बांधकामांचा साकल्याने विचार करावा लागेल. मात्र यापुढील काळात अनधिकृत बांधकामे होता कामा नयेत याची दक्षता घ्यायला हवी. अशा बांधकामांकडे दुर्लक्ष करणाऱ्या अधिकाऱ्यांवर कठोर कारवाई केली पाहिजे. प्रशासकीय यंत्रणांवर जबाबदारी निश्चित केली पाहिजे, असेही त्यांनी सांगितले.
खेड, आंबेगावमध्ये औद्योगिकीकरण झपाटय़ाने होत आहे. खेडमध्ये आंतरराष्ट्रीय विमानतळ तर आंबेगावमध्ये बाबा कल्याणी यांची औद्योगिक वसाहत होऊ घातली आहे. या वाढत्या औद्योगिकीकरण, नागरीकरणामुळे या भागामध्ये पुढील २५ वर्षांत शेतजमीन शिल्लक राहील की नाही याची चिंता सतावत आहे. नव्या उद्योगधंद्यांमुळे या भागाचा चेहरा-मोहरा बदलला आहे. कामगारवर्गात उत्तर भारतीयांची संख्या अधिक असल्याचे स्थानिक आमदारांचे म्हणणे आहे. मात्र ज्यांच्या जमिनी गेल्यात त्या भूमिपुत्रांना कामावर घेण्याची आग्रही भूमिका आहे. भूमिपुत्रांना रोजगार मिळालाच पाहिजे. मात्र त्यांची लायकी असेल, तर तरच त्यांना संधी दिली गेली पाहिजे. त्याचबरोबर परप्रांतातून येणाऱ्यांच्या प्रश्नांची सोडवणूक करण्याची जबाबदारीही राष्ट्रवादीने निभावली पाहिजे.
उपमुख्यमंत्री अजित पवार, खासदार सुळे, चव्हाण, वळसे-पाटील, प्रदेशाध्यक्ष भास्कर जाधव, कार्याध्यक्ष जितेंद्र आव्हाड, उपाध्यक्ष वसंत वाणी  तसेच नामदेव जांभूळकर, राम जांभूळकर, सुरेश घुले, नरसिंग मेंगजी, यशवंत भोसले, संजय पाटील यांची भाषणे झाली. आगामी निवडणुकांच्या पाश्र्वभूमीवर आतापासूनच कामाला लागण्याचे आवाहन त्यांनी कार्यकर्त्यांना केले. यावेळी जिल्ह्यातील लोकसभेच्या तिन्ही जागांवर राष्ट्रवादीचेच उमेदवार विजयी होतील, असा विश्वास व्यक्त करण्यात आला. महापौर बनकर यांनी आभार मानले.

Latest Comment
View All Comments
Post Comment

Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Ncps list of candidate of lok sabha will be with in month sharad pawar

First published on: 11-08-2013 at 02:41 IST

संबंधित बातम्या

मराठी कथा ×