‘जीपीएस’च्या (ग्लोबल पोझिशनिंग सिस्टिम) साहाय्याने राज्यातील रुग्णालयांची माहिती घेण्यात आली असून एकूण १५०० नवीन सार्वजनिक आरोग्य केंद्रे, उपकेंद्रे आणि रुग्णालये सुरू करण्यात येणार असल्याची माहिती मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी दिली. तसेच प्रत्येक जिल्ह्य़ात एक वैद्यकीय महाविद्यालय असावे, अशी शासनाची योजना असून आठ नवीन वैद्यकीय महाविद्यालयेही सुरू करण्यात येणार असल्याचे ते म्हणाले.
रुबी हॉल क्लिनिकच्या वानवडी येथील रुग्णालयाचे गुरुवारी मुख्यमंत्र्यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले. या वेळी ते बोलत होते. वनमंत्री डॉ. पतंगराव कदम, रुग्णालयाचे व्यवस्थापकीय विश्वस्त डॉ. परवेझ ग्रँट, प्रमुख कार्यकारी अधिकारी बोमी भोटे, नगरसेवक प्रशांत जगताप या वेळी उपस्थित होते.
मुख्यमंत्री म्हणाले, ‘‘कर्करोगावरील अद्ययावत उपचार उपलब्ध करून देण्यासाठी अणुऊर्जा विभागाला टाटा मेमोरियल सेंटरसाठी शासनातर्फे पाच एकर जागा उपलब्ध करून देण्यात आली आहे. यात कर्करुग्णांसाठी फोटोन थेरपीसारख्या आधुनिक उपचारांचा समावेश असून प्रकल्पावर सुमारे पाचशे कोटी रुपयांचा खर्च अपेक्षित आहे. तसेच पब्लिक प्रायव्हेट पार्टनरशिपमधून एक्सरे, एमआरआय यांसारख्या चाचण्या रुग्णांना शासनाने ठरवून दिलेल्या अल्प दरात उपलब्ध करून देण्याची योजनाही राबवण्यात येत आहे. राजीव गांधी जीवनदायी आरोग्य योजनेत एक लाख रुपयांपर्यंत वार्षिक उत्पन्न असणाऱ्या नागरिकांना शस्त्रक्रियांमध्ये दीड लाख रुपयांपर्यंतची सवलत मिळू शकणार आहे. ही योजना सध्या ८ जिल्ह्य़ांत सुरू असून पुढील महिन्यापासून ती उर्वरित २५ जिल्ह्य़ांमध्येही राबवली जाईल. राज्यात तातडीची आरोग्य सेवा पुरवण्यासाठी अत्याधुनिक साधनांनी सज्ज रुग्णवाहिकांची मोफत सेवा उपलब्ध करून देण्याचाही शासनाचा प्रयत्न आहे. ‘जीवन अमृत’ योजनेत रक्तपेढीतून मोटारसायकलस्वारांच्या माध्यमातून रुग्णालयात कमी वेळात रक्त पुरवले जात आहे. ही योजना सातारा आणि सिंधुदुर्गमध्ये सुरू आहे. ’’
‘परदेशी चलनासाठी तारांकित रुग्णालयांचीही गरज’
वानवडी येथील हे रुग्णालय खास परदेशी रुग्णांच्या गरजा लक्षात घेऊन बांधण्यात आले आहे. या रुग्णालयाबद्दल बोलताना मुख्यमंत्री म्हणाले, ‘‘आरोग्य सेवा पुरवणे हे मोठे आव्हान आहे. एकूण राष्ट्रीय उत्पन्नापैकी जेवढा खर्च आरोग्यावर करणे आवश्यक आहे तेवढा केला जात नाही. आपल्याला सार्वजनिक रुग्णालये व आरोग्य केंद्रांची गरज आहे. परंतु वैद्यकीय पर्यटनातून मिळणाऱ्या परदेशी चलनाकडे लक्ष देता तारांकित रुग्णालये बांधली जाणेही आवश्यक आहे. या वाढीव उत्पनातून आर्थिकदृष्टय़ा दुर्बल घटकांना आरोग्य सेवेत सवलती देता येतील.’’