नवे शैक्षणिक वर्ष तोंडावर येऊन ठेपले आहे. त्याची तयारीही सुरू झाली आहे. हे वर्ष कसे असेल, सुट्टय़ा कधी असतील, जोडून सुट्टय़ा मिळतील का या प्रमाणेच अभ्यासाचे नियोजन कसे करता येईल याची उत्सुकता विद्यार्थी, शिक्षक आणि कर्मचारी आणि पालकांना नेहमीच असते. त्यासाठी या नव्या शैक्षणिक वर्षांचा घेतलेला आढावा.

नव्या शैक्षणिक वर्षांचे पहिले सत्र १५ जून ते १४ ऑक्टोबर असे जेमतेम चार महिन्यांच्या कालावधीचे असून, अध्यापनासाठी (शिकविण्यासाठी) मात्र, १५ जून ते २९ सप्टेंबर (शुक्रवार) असे जेमतेम साडेतीन महिन्यांचा कालावधी मिळणार आहे. या काळात ९ सुट्टय़ा आहेत (२९ सप्टेंबपर्यंत). मात्र दुसऱ्या सत्रातील ३० ऑक्टोबर ते १३ फेब्रुवारी २०१८ अशा साडेतीन महिन्यांच्या कालावधीत फक्त ५ सुट्टय़ा आहेत. त्यामुळे दुसरे सत्र लहान वाटत असले, तरी १४ फेब्रुवारी ते २८ मार्च असा सहा आठवडय़ांचा कालावधी दुसऱ्या सत्रात (पाचवी ते नववीसाठी) जास्त शिकवायला मिळणार आहे. शैक्षणिक वर्षांत उन्हाळी सुट्टी नेहमीप्रमाणे ३८ दिवस (रविवार सोडून) घेतली, तर दिवाळीची सुट्टी गेल्या दोन वर्षांप्रमाणे २ आठवडय़ांचीच द्यावी लागेल व दुसऱ्या सत्रात शाळा सोमवार,  ३० ऑक्टोबरपासून सुरू कराव्या लागतील.

या शैक्षणिक वर्षांचे वैशिष्टय़ म्हणजे दहावीचा दुसऱ्या सत्रात (६ जानेवारी २०१८ पर्यंत) ४० टक्के अभ्यासक्रम व्यवस्थित शिकवून पूर्ण होईल. त्यामुळे पहिल्या सत्रात अभ्यासक्रमाचे वार्षिक नियोजन महत्त्वाचे ठरणार आहे. दहावीला भूमिती हा विषय बऱ्याच विद्यार्थ्यांना अवघड जातो. हे लक्षात घेऊन भूमितीची १, ३, ६ ही प्रकरणेच पहिल्या सत्रात वेळ देऊन व व्यवस्थित शिकवता येतील. बीजगणिताची १, ३, ४, ६ अशी चार प्रकरणे पहिल्या सत्रात शिकवणे शक्य आहे.

काही दिवसांपूर्वी शिक्षण विभागाने दिवाळी सुट्टी, उन्हाळी सुट्टी कमी करून गणेशोत्सवात, नाताळमध्ये ही सुट्टी घेता येईल, असे जाहीर केले आहे. पुढच्या वर्षी २०१८ सालात ११ जूनपासून शाळा सुरू केल्या (विदर्भ, मराठवाडा वगळता) तर उन्हाळी सुट्टी चार दिवसांची कमी होऊन ती गणेशोत्सव व नाताळमध्ये देता येईल. गणेशोत्सवात पुणे-मुंबईसारख्या ठिकाणी वाहतुकीची प्रचंड कोंडी होते. श्री गणेश चतुर्थी (२५ ऑगस्ट) व अनंत चतुर्दशी (५ सप्टेंबर) शिवाय २ सप्टेंबर (बकर ईद- शनिवार)च्या सुट्टय़ा आहेतच. गौरीपूजनाची सुट्टी (बुधवार, ३० ऑगस्ट) बऱ्याच शाळा घेतातच. ३ सप्टेंबरला रविवारची सुट्टी आहे. मग ३०, ३१ ऑगस्ट, १, २ सप्टेंबर अशा सुट्टय़ा घेतल्यास शेकडो स्कूल बसेस, स्कूल व्हॅन व पालकांच्या गाडय़ा सलग पाच दिवस (३० ऑगस्ट ते ३ सप्टेंबर) रस्त्यावर धावणार नाहीत व वाहतुकीची कोंडी नक्कीच कमी होईल.

दीनानाथ द. गोरे, पुणे