खाकी वर्दीतील रुबाब आणि दरारा. त्यात ‘दबंग’ आणि ‘सिंघम’ चित्रपटांतील अभिनेत्यांप्रमाणे पिळदार शरीर असेल तर.? पोलीस दलातील तरुणांवर आता अशा चित्रपटांची प्रभाव पडत असून ते स्वत:च्या शरीराबाबत जागरूक बनले आहेत. कामामुळे दिवसभर वेळ नसला तरी त्यानंतर व्यायाम करून स्वत:चे शरीर राखण्यावर भर दिला जात आहे. त्यामुळेच तरुण पिढी तरी ‘ढेरपोटय़ा’ राहिलेली नाही, फिटनेसच्या प्रेमामुळे तिची प्रतिमा बदलत असल्याचे पाहायला मिळत आहे.
पोलीस दलात दाखल झाल्यानंतर कामाचा ताण आणि बारा-बारा तासाच्या सेवेमुळे तंदुरुस्तीकडे दुर्लक्ष होते. त्यामुळे पस्तिशी ओलांडली, की पोलिसांची ढेरी सुटल्याचे चित्र दिसते. पण, अलीकडे पोलीस दलात दाखल होणाऱ्या तरुणांमध्ये तंदुरुस्तीविषयी कमालीची जागरूकता वाढली आहे. त्याच बरोबर पस्तिशी ओलांडलेले पोलीस अधिकारी व कर्मचारी तंदुरुस्तीकडे विशेष लक्ष देऊ लागले आहेत. कामाच्या व्यापातून वेळ नाही मिळाला, तर संध्याकाळी व्यायाम करणाऱ्यांची संख्या मोठी आहे. पोलिसांवर आलेले ‘दबंग’ आणि ‘सिंघम’ चित्रपटातील नायकांप्रमाणे आपलेही शरीर असावे, सर्वामध्ये आपण वेगळे दिसावे म्हणून पोलीस दलात दाखल झालेले तरुण नियमित व्यायमाशाळेत जात आहेत. चित्रपटांमध्ये पोलीस पिळदार शरीरयष्टीमध्ये दाखवलेल्या पोलिसांचा प्रभाव खात्यात येणाऱ्या नवीन तरुणांवर दिसत आहे.
याबाबत डेक्कन पोलीस ठाण्यातील पोलीस कर्मचारी महेश निंबाळकर यांनी सांगितले, की पोलीस दलात येणाऱ्या तरुणांमध्ये निश्चित जागरूकता वाढली आहे. पोलीस खात्यात दाखल होणारे तरुण पहिल्यापासूनच शरीरयष्टीकडे लक्ष देत असतात. खात्यात दाखल झाल्यानंतर आपल्या तंदुरुस्तीकडे अधिक लक्ष देऊन कसून व्यायाम करतात. ‘दबंग’ आणि ‘सिंघम’ चित्रपटांत दाखविलेल्या पोलीस अभिनेत्यांप्रमाणे पिळदार शरीराचा प्रभाव तरुणांवर दिसत आहे. बहुतांश तरुण सकाळी लवकर ‘जॉगिंग’ ला जाऊन तासभर तरी व्यायाम करतात. सकाळी व्यायाम करण्यास वेळ न मिळाल्यास संध्याकाळी व्यायाम शाळेत जाऊन व्यायाम करणाऱ्यांची संख्या सुद्धा खूप आहे. या खात्यात कामाची पद्धत वेगळी असल्यामुळे आहारावर नियंत्रण करू शकत नाहीत. फक्त चांगले व्यायाम करूनच आपली तंदुरुस्ती कायम ठेवली जात असल्याचे दिसून येते.
पोलीस टोपी घालण्याची वाटते लाज
पोलीस दलात दाखल झालेला तरुण फिटनेसबाबत जागरूक असून व्यायाम करून कमवलेली शरीरयष्टी दिसावी म्हणून फिट कपडे घालतात. त्याचबरोबर शरीरयष्टीकडे लक्ष वेधले जाईल, अशा पद्धतीने शिवलेली खाकी वर्दी घालतात. मात्र, हेच तरुण पोलीस वर्दीत मिळणारी टोपी घालण्यास लाज वाटते म्हणून त्यावर पर्याय म्हणून कॅप घालताना दिसून येतात.
संग्रहित लेख, दिनांक 20th Aug 2013 रोजी प्रकाशित
पोलीस दलातील तरुणाईत फिटनेसबाबत जागरुकता!
खाकी वर्दीतील रुबाब आणि दरारा. त्यात ‘दबंग’ आणि ‘सिंघम’ चित्रपटांतील अभिनेत्यांप्रमाणे पिळदार शरीर असेल तर...?
First published on: 20-08-2013 at 03:00 IST
Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: New recruitment of police is much aware about fitness