येमेनमधील अल-हुतैब या प्राचीन गावातील १००० वर्षे जुन्या मशिदीला बळकटी देण्यासाठी पुण्यातील तंत्रज्ञानाची मदत घेण्यात आली असून, हे काम अलीकडेच पूर्ण करण्यात आले. उंच कडय़ावर असलेल्या या मशिदीचे आयुष्य या कामामुळे बऱ्याच काळासाठी वाढले आहे.
येमेन सध्या यादवीसाठी ओळखला जातो. मात्र, या देशातील अल-हुतैब हे गाव बोहरा मुस्लिम समाजाच्या प्राचीन धार्मिक स्थळांसाठी प्रसिद्ध आहे. तेथील एक मशीद हजार वर्षे जुनी असून, ती टेकडीवर बांधण्यात आलेली आहे. ती टेकडी ३५ मीटर उंच आहे. या टेकडीच्या पायथ्याला बोहरा धर्मगुरूंचे निवासस्थान आहे. या टेकडीच्या खडकांची मोठय़ा प्रमाणात झीज झाली होती. त्यामुळे त्यावरील खडकांचे भाग तुटून खाली येण्याचा धोका निर्माण झाला होता. त्यामुळे येथील प्रशासनाने २०१० साली या ठिकाणाचे परीक्षण केले होते. मशीद टिकवण्यासाठी आणि खालील वस्तीला संरक्षण देण्यासाठी या टेकडीचे बळकटीकरण आवश्यक होते. त्याचा तांत्रिकदृष्टय़ा व्यवहार्य आणि आर्थिकदृष्टय़ा परवडणारा मार्ग शोधण्याचा प्रयत्न सुरू होता.
तेथील प्रशासनाने अभियांत्रिकी क्षेत्रात सल्लागार असलेल्या घारपुरे असोसिएट्स यांना भेट देण्याची विनंती केली. त्यांनी कोकण रेल्वेचे माजी व्यवस्थापकीय संचालक डॉ. केतन गोखले यांच्यासह त्या ठिकाणाची पाहणी केली. त्यानंतर विस्तृत अहवाल सादर केला. त्यात या टेकडीच्या बळकटीकरणाचा सविस्तर उपाय सादर केला होता. त्यात त्यांनी पुण्यातील डिंपल केमिकल्स या कंपनीने विकसित केलेला उपाय सुचवला होता. त्यानुसार या कंपनीचे मालक अनिल केळकर यांनी हे काम हाती घेतले, अशी माहिती या कंपनीचे निखिल केळकर यांनी दिली.
सुरुवातीला जानेवारी २०११ मध्ये नमुना म्हणून टेकडीच्या छोटय़ा भागावर पॉली आयरॉनाईट सिरॅमिक सिमेंट्स (पीआयसीसी) कंपाउंड या रसायनाचा थर देण्यात आला. त्याचा वापर करून तेथील भेगाही भरून घेण्यात आल्या. या थरामुळे काय परिणाम झाला, याची तपासणी २०१४ साली करण्यात आली. तेव्हा त्या थरामुळे तेथील खडकाचा भाग सुस्थितीत असल्याचे आढळळे. त्यानंतर टेकडीच्या आवश्यक त्या भागाला पीआयसीसी कंपाउंडचा थर देण्यात आला. हे काम या वर्षांत पूर्ण करण्यात आले. येमेनमध्ये यादवी युद्ध भडकलेले असतानाही अखेरच्या टप्प्यातील काम पूर्ण करण्यात आले. या कामामुळे टेकडीचे आणि पर्यायाने मशिदेचे आयुष्य वाढले आहे. त्याचबरोबर दरड कोसळण्याचा खालच्या वस्तीला असलेला धोकाही दूर झाला आहे, असे केळकर यांनी सांगितले.
पीआयसीसी तंत्राद्वारे कृत्रिम तलाव
पीआयसीसी कंपाउंडचा वापर करून न गळणारा तळ निर्माण कतरता येतो. त्यामुळे हे तंत्र कृत्रिम तलावासाठी वापरले जाते. त्याचा वापर करून तयार केलेले तलाव गळत नाहीत. असा अडीच एकर क्षेत्रावरील कृत्रिम तलाव पुण्यातील अॅमोनोरा पार्क या वसाहतीत तयार करण्यात आला आहे. याशिवाय या तंत्राचा वापर करून काही धरणांच्या बळकटीकरणाचे कामही करण्यात आले आहे.