दोन लसमात्रा घेतल्या तरी पुणे-लोणावळा प्रवाशांना फायदा नाही

पुणे : लशींच्या दोन मात्रा घेऊन पुणे-लोणावळा लोकलच्या प्रवासासाठी ओळखपत्र मिळविले तरी प्रवाशांना दैनंदिन तिकीट दिले जाणार नसल्याने प्रवासमुभा देऊनही हजारो प्रवासी त्यापासून वंचित राहत आहेत. मासिक पास घेतला, तरच संबंधितांना प्रवास करता येत आहे. फलाट तिकीट आणि पास देण्यासाठी स्थानकांवरील खिडक्या उघडय़ा असताना केवळ दैनंदिन तिकिटासाठीच त्या बंद का, असा प्रश्न प्रवाशांकडून उपस्थित केला जात आहे.

अत्यावश्यक सेवेतील कर्मचाऱ्यांना यापूर्वीच रेल्वेच्या उपनगरीय गाडय़ांतून प्रवासमुभा देण्यात आली आहे. त्या वेळी सर्वासाठी दैनंदिन तिकीट देणे बंद करण्यात आले होते. सर्वासाठी उपनगरीय गाडय़ांच्या मागणीने जोर धरल्याने मुंबईतील उपनगरीय वाहतुकीची आवश्यकता लक्षात घेता लशींच्या दोन मात्रा घेतलेल्या आणि दुसरी मात्रा घेऊन १४ दिवस पूर्ण केलेल्या सर्वसामान्यांना प्रवासमुभा देण्यात आली.

पुणे-लोणावळा उपनगरीय वाहतुकीबाबतही हा निर्णय लागू करण्यात आला. त्यासाठी संबंधित प्रवाशाला स्थानिक प्रशासनाकडून ओळखपत्र दिले जात आहे. मात्र, या ओळखपत्रावर रेल्वेकडून केवळ मासिक पास दिला जातो. त्यामुळे कधीतरी किंवा आठवडय़ातून दोन-तीन वेळा प्रवास करावा लागणाऱ्या प्रवाशांना लशींच्या दोन मात्रा घेऊन किंवा ओळखपत्र मिळवूनही त्याचा लाभ घेता येत नाही.

रेल्वे प्रवासी ग्रुपच्या अध्यक्षा हर्षां शहा यांनी याबाबत सांगितले, की मुळात नागरिकांसाठी लशींचा तुटवडा आहे. त्यामुळे लशींबाबतची सक्ती काढून टाकणे गरजेचे आहे. कामधंदे सुरू असताना स्वस्त आणि वेळेत प्रवासाच्या उपनगरीय रेल्वेतून प्रवास करता येत नसल्याने अनेक प्रवासी हैराण झाले आहेत. प्रवास खर्चातही मोठी वाढ झाली आहे. प्रवासासाठी दोन लसमात्रा घेतल्या तरी दैनंदिन तिकीट मिळत नाही. त्यामुळे शासनाच्या निर्णयाचा बहुतांश प्रवाशांना फायदा नाही. सर्वच गाडय़ांच्या प्रवाशांना तिकीट खिडकीवर तिकीट उपलब्ध करून द्यावे आणि रेल्वेच्या सर्वच प्रकारच्या गाडय़ा पूर्वीप्रमाणे नियमित सुरू कराव्यात.

तर्कहीन आदेश, रेल्वेचाही तोटा

उपनगरीय रेल्वेतून प्रवासमुभा देताना मुंबईनुसार पुण्यातही राज्य शासनाने आदेश काढले. तेच आदेश स्थानिक प्रशासनाने जसेच्या तसे लागू केले. लशींच्या दोन मात्रा घेतलेल्यांना स्थानिक प्रशासनाने दिलेल्या ओळखपत्राच्या आधारे उपनगरीय प्रवासासाठी मासिक, त्रमासिक पास देण्यात यावेत, असे आदेशात म्हटले आहे. पुणे-लोणावळा रेल्वेचा लाभ घेणाऱ्यांमध्ये दैनंदिन तिकिटावर प्रवास करणाऱ्या प्रवाशांची संख्या पासधारकांच्या तुलनेत मोठी आहे. सुमारे ७० टक्के प्रवाशांना त्याचा लाभ होणार नाही. त्यात रेल्वेचाही तोटाच असल्याने संबंधित आदेशच तर्कहीन असल्याचा आरोप प्रवासी संघटना करीत आहेत.

उपलब्ध गाडय़ांचाही फायदा नाही

पुणे-लोणावळा उपनगरीय रेल्वे सध्या अत्यावश्यक सेवेतील कर्मचाऱ्यांसाठी सुरू आहेत. प्रशासनाचे ओळखपत्र मिळालेल्यांना मासिक पासवर प्रवासमुभा आहे. मात्र, गाडय़ांच्या फेऱ्या अत्यंत कमी असल्याने पात्र ठरणाऱ्या प्रवाशांनाही या फेऱ्या उपयुक्त नसल्याचे दिसून येते. र्निबधांपूर्वी पुणे-लोणावळा मार्गावर ४३ ते ४४ फेऱ्या होत्या. त्यात ८० टक्क्य़ांनी घट करण्यात आली आहे. गाडय़ांच्या आणि नोकरी-व्यावसायाच्या वेळा जुळत नसल्याने फेऱ्या वाढविण्याची मागणीही करण्यात येत आहे.