scorecardresearch

महापालिकेच्या ढिसाळ नियोजनाचा शहराला फटका, पूर्वकल्पना न देता अनेक भागाचा पाणीपुरवठा बंद

पुणे महापालिकेच्या पाणीपुरवठा विभागाच्या ढिसाळ नियोजनामुळे शहराच्या अनेक भागांना गुरुवारी पाणीपुरवठा होऊ शकला नाही.

(File Photo)

पुणे महापालिकेच्या पाणीपुरवठा विभागाच्या ढिसाळ नियोजनामुळे शहराच्या अनेक भागांना गुरुवारी पाणीपुरवठा होऊ शकला नाही. वडगाव जलकेंद्र, विमाननगर आणि धानोरी टाकीवर अवलंबून असलेल्या भागाचा पाणीपुरवठा गुरुवारी बंद राहणार असल्याची सूचना पाणीपुरवठा विभागाने दिली. मात्र, सहकारनगर, बालाजीनगर, धनकवडीसह अन्य भागाला पाणीपुरवठा होऊ शकला नाही. तर औंध, बाणेर, बालेवाडी, शिवाजीनगर, हडपसर या भागात विस्कळीत पाणीपुरवठा झाला. दरम्यान, पूर्वसूचनेनुसार सिंहगड रस्ता आणि पूर्व भागाचा पाणीपुरवठा बंद ठेवण्यात आला.

जलकेंद्रांच्या देखभाल दुरुस्तीसाठी संपूर्ण शहरातील किंवा शहराच्या काही भागाचा पाणीपुरवठा बंद ठेवायचा झाल्यास किमान चार दिवस आधी पाणीपुरवठा विभागाकडून पूर्वकल्पना दिली जाते. मात्र शहराच्या काही भागाचा पाणीपुरवठा गुरुवारी बंद राहणार असल्याची सूचना बुधवारी देण्यात आली. त्यामुळे नागरिकांची तारांबळ उडाली. असं असतानाच पाणीपुरवठा बंद ठेवण्यात आलेल्या भागाबरोबरच शहराच्या अन्य भागालाही त्याचा फटका बसला.

सहकारनगर, बालाजीनगर, धनकवडी या भागाला गुरुवारी सकाळी पाणीपुरवठा होऊ शकला नाही. पूर्वकल्पना न देता पाणीबंद ठेवण्यात आल्याने नोकरदारवर्गाला त्याचा मोठा फटका बसला. उन्हाळ्यामुळे पाण्याची मागणी वाढली आहे. यातच पाणी बंद ठेवण्यात आल्याने आणि विस्कळीत तसेच अपुरा पाणीपुरवठा झाल्याने अनेक नागरिकांची मोठी गैरसोय झाली. यासंदर्भात अनेक नागरिकांनी क्षेत्रीय कार्यालये आणि पाणीपुरवठा विभागाकडे तक्रार केली. मात्र नागरिकांना उडवाउडवीची उत्तरे देण्यात आली.

गेल्या काही महिन्यांपासून मध्यवर्ती भागासह उपनगरातील पाणीपुरवठा विस्कळीत झाला आहे. त्याबाबत लोकप्रतिनिधींनीही तक्रारी केल्या आहेत. शहरात सध्या समान पाणीपुरवठा योजनेचे काम सुरू आहे. त्याअंतर्गत नव्याने जलवाहिन्या टाकण्याबरोबरच जुन्या-जीर्ण वाहिन्यांच्या दुरुस्तीची कामे हाती घेण्यात आली आहेत. मात्र या कामांनंतरही शहराचा पाणीपुरवठा विस्कळीत होत असल्याने नाराजी व्यक्त होत आहे. एकवेळ पुरेशा दाबाने पाणीपुरवठा करावा, अशी नागरिकांची मागणी आहे. मात्र विस्काळीत पाणीपुरवठ्याला तांत्रिक कारण पुढे केले जात आहे. दरम्यान, पूर्वसूचना दिलेल्या भागाचा पाणीपुरवठा बंद होता. अन्य भागातील पाणीपुरवठा सुरळीत होता, असा दावा पाणीपुरवठा विभागाच्या अधिकाऱ्यांकडून करण्यात आला.

मराठीतील सर्व पुणे ( Pune ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: No water supply in many areas of city due to mismanagement in pune print news pbs

ताज्या बातम्या