त्या लाचखोर प्रकरणी होणार या सदस्यांची चौकशी 

पिंपरी-चिंचवड महानगर पालिकेच्या स्थायी समितीच्या 15 सदस्यांना एसीबी ने नोटीस पाठवली असून 29 सप्टेंबर पर्यंत हजर राहण्यास सांगितले आहे. अशी माहिती तपास अधिकारी पोलीस उपअधीक्षक सीमा मेहंदळे यांनी लोकसत्ता ऑनलाइन ला दिली आहे. 18 ऑगस्ट रोजी स्थायी समितीचे अध्यक्ष नितीन लांडगे यांच्यासह पाच जणांना लाच स्वीकारताना एसीबी च्या जाळ्यात अडकले होते. या प्रकरणी त्यांना एसीबी ने अटक केली होती. या प्रकरणातील एक ऑडिओ क्लिप पुढे आली असून त्याच संदर्भात 15 सदस्यांची चौकशी होणार असल्याचे एसीबी सूत्रांनी सांगितले आहे. 

एसीबी केलेल्या कारवाईनंतर स्थायी समिती अध्यक्ष नितीन ज्ञानेश्वर लांडगे, ज्ञानेश्वर किसनराव पिंगळे (मुख्य लिपिक), विजय शंभुलाल चावरिया (लिपिक), राजेंद्र जयंतराव शिंदे (संगणक चालक), अरविंद भीमराव काळे (शिपाई) यांच्यावर गुन्हा दाखल झाला होता. 

नेमकं प्रकरण काय आहे?

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

तक्रारदार हे जाहिरातीचा व्यवसाय करतात पिंपरी चिंचवड महानगरपालीकेच्या जागेमध्ये होर्डींग उभारण्याकरीता त्यांनी भरलेल्या २८ निविदा मंजुर झालेल्या होत्या. परंतु, त्यांची वर्कऑर्डर न निघाल्याने तक्रारदार हे स्थायी समितीचे सभापती अॅडव्होकेट नितीन ज्ञानेश्वर लांडगे व त्यांचे स्वीय सहायक ज्ञानेश्वर पिंगळे यांना भेटले. तेव्हा, वर्क ऑर्डर मिळविण्यासाठी च्या करारनाम्यावर सही करण्यासाठी त्या २८ निविदांच्या बोली रक्कमेच्या (बीड अमाऊंट) ३ टक्के रक्कम म्हणजे १० लाख रूपये लाचेची मागणी केली. तडजोडीअंती २ टक्केप्रमाणे सहा लाख रूपये घेण्याचे मान्य झाले. ६ लाख रूपयांची मागणी करून त्यापैकी तयार असलेल्या ६ करारनाम्यांच्या फाईल्सवर सही शिक्का देण्याकरीता २ टक्क्याप्रमाणे १ लाख १८ हजार लाच रक्कमेची मागणी करून ती तेथील लिपिक – विजय चावरिया, संगणक चालक राजेंद्र शिंदे व शिपाई, अरविंद कांबळे यांच्या मार्फत स्वीकारल्यावर या सर्वांना ताब्यात घेण्यात आले होते. याप्रकरणी आता स्थायी समितीच्या 15 सदस्यांना नोटीस बजावण्यात आली असून त्यांची  चौकशी होणार आहे हे निश्चित.