एखाद्या गुन्ह्य़ात न्यायालयाने दोषी ठरताच लोकप्रतिनिधीला अपात्र ठरवले जावे या सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या निकालाचा थेट परिणाम काँग्रेसचे निलंबित खासदार सुरेश कलमाडी यांच्या आगामी निवडणुकीवर होणार आहे. या निकालामुळे कलमाडी लोकसभा निवडणूक रिंगणाच्या बाहेर गेल्यात जमा आहेत. कलमाडींवरील आरोप विशेष न्यायालयाने निश्चित केले असून त्यांचे स्वरूप पाहता काँग्रेस त्यांना पुण्यातून उमेदवारी देण्याचा धोका पत्करणार नाही, असे चित्र आहे.
पुढील वर्षी होत असलेली लोकसभा निवडणूक पुण्यातून लढण्यासाठी कलमाडी अद्यापही इच्छुक आहेत आणि त्यांच्या समर्थकांनाही तसे वाटत असले, तरी सर्वोच्च न्यायालयाने नुकत्याच दिलेल्या निकालामुळे कलमाडींना काँग्रेसकडून उमेदवारी मिळण्याची शक्यता नसल्याचे आता सांगितले जात आहे. राष्ट्रकुल स्पर्धेतील भ्रष्टाचार प्रकरणी कलमाडींवर कारवाई झाल्यानंतर त्यांना काँग्रेसने पक्षातून निलंबित केले. मात्र, लोकसभेपूर्वी ते पक्षात परततील आणि पुण्यातून लोकसभा लढतील, असा दावा कलमाडी समर्थकांकडून अजूनही केला जात आहे.
गेल्यावर्षी ११ जून रोजी महापालिकेत येऊन कलमाडी यांनी एका कार्यालयाचे उद्घाटन केले होते आणि आयुक्तांची भेट घेऊन शहराच्या प्रश्नांबाबत चर्चा केली होती. मी निर्दोष आहे आणि पुणे शहराच्या विकासासाठी कटिबद्ध आहे, असा दावा करतानाच आगामी लोकसभा निवडणूक पुण्यातूनच लढवणार, अशी घोषणा कलमाडी यांनी त्या वेळी केली होती. त्या वेळी कलमाडी यांच्या समर्थनार्थ शेकडो काँग्रेस कार्यकर्ते, अनेक नगरसेवक आणि काँग्रेसचे पदाधिकारी आवर्जून जमले होते. या शक्तिप्रदर्शनाच्या वेळी ‘सब से बडा खिलाडी सुरेशभाई कलमाडी’ या घोषणांनी पालिका भवन दणाणून सोडण्यात आले होते.
राष्ट्रकुल स्पर्धामधील ९० कोटींच्या गैरव्यवहारप्रकरणी कलमाडी यांच्यासह स्पर्धा संयोजन समितीच्या नऊ सदस्यांवर आरोप निश्चित करण्यात आले असून फसवणूक, गुन्हेगारी स्वरूपाचे कट रचणे, पुरावे नष्ट करणे आणि भ्रष्टाचारविरोधी कायद्यांतर्गत इतर गुन्ह्य़ांचे आरोप त्यांच्यावर आहेत. या गुन्ह्य़ांमध्ये दोषी ठरल्यास सर्वोच्च न्यायालयाच्या निकालानुसार कलमाडी यांचे पद आपोआप रद्द होईल. अशा परिस्थितीत कलमाडींना पुन्हा पक्षात घेणे आणि पुण्यातून उमेदवारी देणे काँग्रेससाठी चांगलेच अडचणीचे ठरणार आहे. न्यायालयाने दिलेल्या ताज्या निकालाच्या पाश्र्वभूमीवर काँग्रेस त्यांना उमेदवारी देण्याचा धोका पत्करणार नाही, असे आता सांगितले जात आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Now kalmadi cant contess loksabha election
First published on: 14-07-2013 at 02:55 IST