राज्यातील पाणीवाटप व इतर महत्त्वाच्या जबाबदाऱ्या असूनही गेले सहा महिने निष्क्रिय असलेल्या महाराष्ट्र जलसंपदा नियमन प्राधिकरणाला (एम.डब्ल्यू.आर.आर.ए.) न्यायालयाच्या दट्टय़ानंतर अखेर अध्यक्ष व सदस्य मिळाले आहेत. त्यामुळे सध्याची पाणीटंचाई तसेच, उच्च न्यायालयाने उजनी व जायकवाडी धरणांमध्ये पाणी सोडण्याचे आदेश दिल्याच्या पाश्र्वभूमीवर धरणांमधील पाणी सोडण्याबाबत प्राधिकरण काय निर्णय घेणार याबाबत उत्सुकता आहे.
प्राधिकरणाचे अध्यक्ष म्हणून माजी प्रशासकीय अधिकारी माजी अतिरिक्त मुख्य सचिव रवी बुद्धिराजा यांची, तर सदस्य म्हणून माजी वित्त सचिव चित्कला झुत्शी यांची नियुक्ती करण्यात आली आहे. त्याचबरोबर सदस्य सचिव म्हणून सुरेश सोडल प्राधिकरणात आहेत. प्राधिकरणाचे पहिले अध्यक्ष अजित निंबाळकर तसेच, सदस्य ए.के.डी. जाधव व व्यंकटराव गायकवाड यांचा कार्यकाल संपल्यानंतर गेले सुमारे सहा महिने प्राधिकरणावर अध्यक्ष व सदस्य नव्हते. सदस्य सचिव म्हणून सोडल एकटेच प्राधिकरणावर होते. त्यामुळे आताच्या टंचाईच्या काळात पाणीवितरणाबाबत काही निर्णय घेणे शक्य होत नव्हते. याबाबत काही कार्यकर्त्यांनी उच्च न्यायालयात दाद मागितल्यानंतर न्यायालयाने सरकारला फटकारले होते. त्याच वेळी उच्च न्यायालयानेच उजनी व जायकवाडी या धरणांमध्ये वरून पाणी सोडण्याबाबत आदेश दिले होते.
या पाश्र्वभूमीवर सरकारने तातडीने अध्यक्ष व एका सदस्याची नेमणूक केली. त्यामुळे आता प्राधिकरण सक्रिय होऊ शकेल आणि टंचाईच्या काळात पाणीवाटपासारख्या महत्त्वाच्या मुद्दय़ांवर निर्णय घेऊ शकेल.
संग्रहित लेख, दिनांक 26th Apr 2013 रोजी प्रकाशित
जलसंपदा नियमन प्राधिकरणाला अखेर अध्यक्ष, सदस्य मिळाले!
राज्यातील पाणीवाटप व इतर महत्त्वाच्या जबाबदाऱ्या असूनही गेले सहा महिने निष्क्रिय असलेल्या महाराष्ट्र जलसंपदा नियमन प्राधिकरणाला (एम.डब्ल्यू.आर.आर.ए.) न्यायालयाच्या दट्टय़ानंतर अखेर अध्यक्ष व सदस्य मिळाले आहेत.

First published on: 26-04-2013 at 02:05 IST
Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Now mwrra have chairman and working members