पक्षातील जुन्या कार्यकर्त्यांचे दबाबतंत्र यशस्वी; अनेकांना महत्त्वाची पदे

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

पिंपरी : पिंपरी शहर भाजपमध्ये इतर पक्षातून भाजपमध्ये आलेले कार्यकर्त्यांचे लोंढे वाढल्यानंतर निष्ठावंत कार्यकर्त्यांची गळचेपी होऊ लागली. पक्षाच्या जुन्या कार्यकर्त्यांवर सातत्याने अन्याय होत असल्याच्या भावनेतून सुरू करण्यात आलेल्या ‘ओल्ड इज गोल्ड’ मोहिमेला बऱ्यापैकी यश आल्याचे दिसून येते. अनेकांना मुख्य प्रवाहात सामावून घेण्याची भूमिका शहराध्यक्ष लक्ष्मण जगताप यांनी पक्षश्रेष्ठींच्या सूचनेनंतर घेतली आहे.

साडेचार वर्षांपूर्वीपर्यंत पिंपरी-चिंचवड शहरातील भाजपची अवस्था दयनीय स्वरूपाची होती. तथापि, मोदी लाटेनंतर शहरातील पक्षाची ताकद वेगाने वाढली. राष्ट्रवादीसह इतर पक्षातील ताकदीचे नेते भाजपमध्ये आले. पाठोपाठ त्यांचे समर्थक येऊ लागले. पक्षात नव्यांची गर्दी वाढली, तसे जुन्या कार्यकर्त्यांकडे दुर्लक्ष होऊ लागले. त्यामुळे पक्षात नवा आणि जुना संघर्ष सुरू झाला. जुने कार्यकर्ते मुख्य प्रवाहापासून दूर लोटले गेले.

अशा परिस्थितीत, जुन्या कार्यकर्त्यांनी माजी नगरसेवक राजू दुर्गे यांच्या नेतृत्वाखाली सुमारे ३५० कार्यकर्ते एकत्र आले. सर्वानी मिळून ‘ओल्ड इज गोल्ड’ मोहीम सुरू केली. जुन्यांची ताकद दाखवून देण्यासाठी या गटाने बराच खटाटोप केला. अलीबाग येथे या संदर्भात चिंतन शिबिर घेण्यात आले. मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्ष, पालकमंत्री अशा सर्वाची भेट घेत कार्यकर्त्यांनी गाऱ्हाणे मांडले. काही ठिकाणी त्यांनी दबावतंत्राचाही वापर केला. अखेर, या गटाच्या उपद्रवमूल्याची दखल घेतली गेली. त्याचाच परिणाम म्हणून रवींद्र नांदूरकर, नंदू भोगले, संतोष घुले, गणेश चव्हाण, दत्तात्रय कोरडे, द्वारकादास कुलकर्णी या सहा जुन्या कार्यकर्त्यांना शहर उपाध्यक्षपद देण्यात आले. तर, महादेव कवितके आणि प्रकाश जवळकर यांच्याकडे जिल्हा सरचिटणीसपदाची जबाबदारी देण्यात आली. त्यापाठोपाठ स्थायी समितीचे अध्यक्षपदही जुन्या कार्यकर्त्यांला मिळाले.

मुख्य प्रवाहापासून दूर गेलेले कार्यकर्ते एकत्र आले. त्याची पक्षश्रेष्ठींनी दखल घेतली. प्रदेशाध्यक्षांच्या सूचनेनुसार संघटनात्मक पातळीवर काही नियुक्तया झाल्या. शासकीय महामंडळे तसेच कमिटय़ांमध्येही जुन्यांचा समावेश होईल. या एकजुटीमुळे विलास मडेगिरी यांना स्थायी समितीच्या अध्यक्षपदाची संधी मिळाली. ही एकजूट यापुढेही कायम राहणार आहे.

– राजू दुर्गे, समन्वयक, ओल्ड इज गोल्ड मोहीम

पिंपरीतील भाजपच्या जुन्या कार्यकर्त्यांना पक्षाच्या मुख्य प्रवाहात सामावून घेण्याची भूमिका पक्षाच्या नेत्यांनीही घेतली आहे.

Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Old is gold campaign work in bjp
First published on: 13-03-2019 at 02:11 IST