शहरातील ४९ रुग्णालयांकडे अग्निशामक दलाचे ना हरकत प्रमाणपत्र नसल्यामुळे त्यांना महापालिकेने परवान्याचे नूतनीकरण नाकारण्यात आले आहे. यापैकी केवळ दोनच रुग्णालयांनी अग्निशामक यंत्रणांची पूर्तता करून हे प्रमाणपत्र मिळवले असून इतर ४७ रुग्णालये अग्निशामक दलाच्या प्रमाणपत्राशिवाय सुरू आहेत.
‘फायर अॅक्ट’ नुसार अशा रुग्णालयांच्या इमारती सील करण्यापर्यंतचे अधिकार अग्निशामक दलाला आहेत. मात्र आरोग्य विभागातर्फे अग्निशामक दलाला रुग्णालयांची माहिती कळवली जाणे अपेक्षित असल्यामुळे रुग्णालयांवर आतापर्यंत कोणतीच कडक कारवाई झालेली नाही. या परिस्थितीत एखादी दुर्घटना घडल्यास त्याला जबाबदार कोण, हा प्रश्न अनुत्तरितच आहे.
मुलुंडमधील एका रुग्णालयाला गुरुवारी लागलेल्या आगीत एका डॉक्टरला जीव गमवावा लागला होता. या पाश्र्वभूमीवर रुग्णालयांमधील अग्निशमन यंत्रणेच्या पूर्ततेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. अग्निशामक दलाच्या नियमांनुसार रुग्णालयातील अग्निशमन यंत्रणांची पूर्तता करणे हे काम वेळ घेणारे असल्यामुळे परवाना नूतनीकरण नाकारल्यानंतर रुग्णालयांवर लगेच कारवाई केली जात नसल्याचे पालिकेचे आरोग्य प्रमुख डॉ. एस. टी. परदेशी यांनी सांगितले. ते म्हणाले, ‘‘शहरात ४९६ नोंदणीकृत रुग्णालये आहेत. २०११ पासून सरकारने रुग्णालयांना अग्निशामक दलाचे ना हरकत प्रमाणपत्र घेणे बंधनकारक केले आहे. ना हरकत प्रमाणपत्राअभावी परवाना नूतनीकरण नाकारलेल्या रुग्णालयांची संख्या ४९ आहे, तर प्रमाणपत्राअभावी नोंदणीच न केलेल्या ५८ रुग्णालयांवर पालिकेने खटले भरले आहेत. यातील काही रुग्णालयांना पाच हजार रुपयांपर्यंतचा दंड झाला आहे. प्रमाणपत्र नसताना रुग्णालयात दुर्घटना घडल्यास त्या रुग्णालयावर कडक कारवाई होऊ शकते.’’
फायर अॅक्टनुसार ना हरकत प्रमाणपत्र न घेणाऱ्या रुग्णालयांवर कडक कारवाई करण्याचे अधिकार अग्निशामक दलाला आहेत. अग्निशामक दलाचे प्रमुख प्रशांत रणपिसे म्हणाले, ‘‘ना हरकत प्रमाणपत्र नसलेल्या रुग्णालयांना सुरुवातीला नोटीस देऊन अग्निशमन यंत्रणेसंबंधीच्या त्रुटींची पूर्तता करण्यास सांगितले जाते. रुग्णालयांनी ही पूर्तता न केल्यास त्या इमारतीची वीज जोडणी तसेच पाणीपुरवठा बंद करण्याचे अधिकार अग्निशामक दलाला आहेत. त्यानंतरही रुग्णालयाकडून प्रतिसाद न मिळाल्यास रुग्णालयाच्या इमारतीला धोकादायक इमारत ठरवून सील करण्याचा अधिकारही आहे. मात्र आतापर्यंत या प्रकारची कारवाई करण्यात आलेली नाही. या रुग्णालयांविषयीची माहिती आरोग्य खात्याकडे असल्यामुळे आरोग्य खात्याकडून ही माहिती हाती आल्यानंतर अग्निशामक दल कारवाई करू शकते.’’