पुण्याच्या महाविद्यालयीन विश्वामध्ये आपले स्थान निर्माण केलेल्या फिरोदिया करंडक एकांकिका स्पर्धेवर दरवर्षी कोणती ना कोणती छाप असते. या वर्षी त्यावर ‘आम आदमी’ चा ठसा दिसत असून, बहुतेक महाविद्यालयांनी सामान्य माणसाचे प्रश्न, अडचणी, मानसिकता या विषयांवर एकांकिका रचल्या आहेत.
सध्या सगळ्या महाविद्यालयांमध्ये फिरोदिया करंडक स्पर्धेची धूम सुरू आहे. या स्पर्धा ३१ जानेवारीपासून सुरू होत आहे. आपला विषय कुणाला कळू नये, आपली रचना काहीतरी वेगळी असावी याच्याच चर्चा महाविद्यालयांमध्ये सुरू आहेत. महाविद्यालयाच्या कलामंडळांमध्ये गाणं, वाद्य, नृत्य, नाटक, चित्रकला, खेळ अशा सगळ्या विषयांमध्ये पारंगत विद्यार्थ्यांचा कसून शोध घेतला जात आहे. फिरोदिया करंडक स्पर्धेवर यावर्षी सामान्य माणसाची छाप दिसत आहे.
यावर्षी फिरोदियामध्ये आतापर्यंत ४६ महाविद्यालयांनी सहभाग घेतला आहे. बहुतेक महाविद्यालयांच्या एकांकिकेचे विषय हे सामान्य माणसाच्या प्रश्नांवर केंद्रित झालेले आहेत. विषय एक असला, तरी तो मांडण्याची पद्धत मात्र प्रत्येकाची वेगळी आहे. किंबहुना आपली एकांकिका वेगळीच असावी यासाठीच प्रत्येकाची धडपड सुरू आहे. सामान्य माणसाचे प्रश्न, मानसिकता यांबाबतचे अनेक पैलू यावर्षी दिसून येतात. सामान्य माणसाची बदल घडवून आणण्याची धडपड, आजूबाजूला भडका उडालेल्या वातावरणाशी थेट संबंध नसलेल्या सामान्य माणसाचा शांततेसाठी सुरू असलेला शोध, बदलणाऱ्या परिस्थितीला तोंड देताना बदलणारी मानसिकता, पगाराच्या मोठय़ा रकमा हातात खेळवणारी आणि काही करायलाच उरले नाही म्हणून आत्महत्या करणारी तरूणाई, घडणाऱ्या घटनांमधून देवत्वाचा शोध घेणारी पिढी, श्रद्धा, अंधश्रद्धा आणि व्यवहार यांमध्ये गोंधळलेली तरूणाई, वेगवेगळ्या समस्यांमुळे बंड करणारा सामान्य माणूस असे विषय विद्यार्थ्यांनी यावर्षी हाताळल्याचे दिसत आहे. मात्र, विषय सकारात्मक शेवटाकडे घेऊन जाण्याकडे विद्यार्थ्यांचा कल दिसतो. बहुतेक महाविद्यालयांच्या संहिता विद्यार्थ्यांनीच लिहिलेल्या आहेत.
—चौकट—
‘‘गेली चाळीस वर्षे चालणाऱ्या या स्पर्धेवर तत्कालीन विषयांची छाप दिसून येते. विद्यार्थ्यांच्या आयुष्यात होणाऱ्या बदलांचे किंवा परिणामांचे प्रतिबिंब फिरोदियाच्या रंगमंचावर दिसून येते. सहा, सात वर्षांपूर्वी बहुतेक एकांकिका या प्रेम, मैत्री, नाते अशा विषयांवर दिसून येत होत्या. सोशल मीडियाचा प्रभाव वाढल्यानंतर या मीडियामुळे घडणाऱ्या गमतींपासून ते त्यामुळे निर्माण होणाऱ्या समस्या या विषयांवर विद्यार्थ्यांचा अधिक भर दिसत होता. त्यानंतर विद्यार्थ्यांचे विषय, नैराश्य, स्पर्धेमुळे होणारे नातेसंबंधातील तणाव, आयटीमध्ये काम करणाऱ्या तरूणांची मानसिकता अशा विषयांना अधिक प्राधान्य होते. या सगळ्यामध्ये गेल्या दोन-तीन वर्षांपासून सामाजिक प्रश्नांवर विद्यार्थी एकांकिका सादर करत आहेत,’’ असे निरीक्षण स्पर्धेचे आयोजक अजिंक्य कुलकर्णी यांनी नोंदवले.