पुणे : चीनच्या बीजिंग शहरातून पुण्यात आलेल्या एका दीड वर्षीय बालकाला ताप, सर्दी, खोकल्याची लक्षणे आढळल्याने नायडू रुग्णालयात मंगळवारी दाखल करण्यात आले. हे बालक आणि त्याचे कुटुंबीय २५ जानेवारीला चीनमधून पुण्यात आले आहेत. मूळचे पुण्याचे असलेले हे कुटुंब गेल्या काही वर्षांपासून चीनमध्ये स्थायिक आहे.

सोमवार (१० फेब्रुवारी) पर्यंत मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावर २५,७८२ प्रवासी तपासण्यात आले आहेत. बाधित भागातून आलेल्या प्रवाशांचा शोध क्षेत्रीय सर्वेक्षणातून देखील घेण्यात येत आहे. राज्यात चीनमधील करोनाबाधित प्रदेशातून १६७ प्रवासी आले आहेत. त्यांमध्ये सोमवारी संध्याकाळी मुंबईतील कस्तुरबा रुग्णालयात भरती करण्यात आलेल्या एका प्रवाशाचा देखील समावेश आहे.

राज्यात एकूण ३९ जणांना विविध लक्षणे आढळल्याने रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्यांपैकी ३७ रुग्णांच्या वैद्यकीय तपासणीत करोना संसर्ग न आढळल्याने त्यांना घरी सोडण्यात आले आहे. सध्या रुग्णालयात दाखल असलेल्या तीन रुग्णांपैकी २ जण नायडू रुग्णालयात तर एक जण कस्तुरबा रुग्णालयात आहेत. नायडू रुग्णालयात दाखल असलेल्या बालकाचे वैद्यकीय नमुने राष्ट्रीय विषाणू विज्ञान संस्थेत पाठवण्यात आले असून त्याचा अहवाल बुधवार (१२ फेब्रुवारी) पर्यंत प्राप्त होणे अपेक्षित आहे.