पुणे जिल्हा परिषदेत नोकरीच्या आमिषाने तरुणांची १८ लाख रुपयांची फसवणूक करण्यात आल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. या प्रकरणी एकास अटक करण्यात आली आहे.नामदेव कान्हू जायभाये (वय ५७, रा. लोहगाव) असे अटक करण्यात आलेल्याचे नाव आहे.

याबाबत एका ज्येष्ठ नागरिकाने विमानतळ पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. तक्रारदार ज्येष्ठ नागरिक बीड जिल्ह्यातील खापरटोन गावाचे रहिवासी असून ते शेतकरी आहेत. आरोपी जायभाये याच्याशी त्यांची एका परिचिताने ओळख करुन दिली होती. ज्येष्ठ नागरिकाच्या मुलाला तसेच नात्यातील सहा जणांना जिल्हा परिषदेत नोकरी लावण्याचे आमिष जायभायेने दाखविले होते.त्यानंतर जायभायेने त्यांना पुण्यात बोलाविले. त्यांच्याकडून १८ लाख १३ हजार रुपये घेतले. पैसे घेतल्यानंतर त्याने जिल्हा परिषदेत नोकरी लावली नाही.

हेही वाचा : पुणे : दुचाकीस्वार तरुणाला लुटणारे चोरटे अटकेत

ज्येष्ठ नागरिकाने जायभायेशी संपर्क साधला. तेव्हा त्याने उडवाउडवीची उत्तरे दिली. फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर त्यांनी पोलिसांकडे तक्रार अर्ज दिला. तक्रार अर्जावरुन पोलिसांनी तपास केला. जायभायेला अटक करण्यात आली असून त्याने आणखी काही जणांची फसवणूक केल्याचा संशय पोलिसांनी व्यक्त केला आहे. सहायक पोलीस निरीक्षक सहाणे तपास करत आहेत.