विसर्जन मिरवणुकीतील दणदणाटावर प्रभावी कारवाई

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

विसर्जन मिरवणुकीत ध्वनिवर्धकांच्या दणदणाटाचा सामान्यांना मोठा त्रास झाला. सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशांचेही उल्लंघन झाले. त्याबाबत पुण्यातील ४२१ मंडळांविरुद्ध पोलिसांनी गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. चंदननगर पोलिसांनी प्रादेशिक परिवहन विभागाक डे (आरटीओ) पाठपुरावा केल्यामुळे एका ‘डीजे रथा’च्या मालकाला एक लाख तीन हजार रुपयांचा दंड ठोठाविण्यात आला आहे. वाहनांच्या रचनेत हवा तसा फेरबदल करणे तसेच फिटनेस चाचणी न केल्याप्रकरणी या ‘डीजे रथा’वर आरटीओने कारवाई केली. अशाप्रकारची ही पुण्यातील पहिलीच कारवाई आहे.

विसर्जन मिरवणुकीत उच्च क्षमतेच्या ध्वनिवर्धक यंत्रणेचा वापर करणाऱ्या मंडळांविरुद्ध कारवाई करण्यासाठी चंदननगर पोलिसांनी खास पथक तयार केले होते. विसर्जन मिरवणुकीच्या दिवशी १५ सप्टेंबर रोजी पोलिसांच्या या पथकाने डेसिबल मीटर यंत्रणेचा वापर केला आणि चंदननगर, वडगांव शेरी भागातील १७ मंडळांविरुद्ध ध्वनिप्रदूषणाचे गुन्हे दाखल केले. त्या दिवशी वडगांव शेरीतील आनंद पार्क भागातील रुद्र प्रतिष्ठानच्या गणेश मंडळाने डीजे रथाचा वापर केला होता. पोलिसांनी कारवाई करून हा डीजे रथ ताब्यात घेतला आणि तो चंदननगर पोलीस ठाण्यात आणून लावला. डीजे रथाचा मालक बाळू जामदार याची या प्रकरणात चौकशी करण्यात आली. त्याच्याकडे वाहनाच्या कागदपत्रांची मागणी केली असता कागदपत्रे सादर केली नाहीत. त्यामुळे पोलिसांनी कारवाईची प्रक्रिया सुरू केली, अशी माहिती चंदननगर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अनिल पाथ्रुडकर यांनी दिली.

डीजे रथ बेकायदा

पुणे शहर आणि जिल्ह्य़ात मिरवणुका तसेच विवाहसमारंभांसाठी मोठय़ा प्रमाणावर डीजे रथांचा वापर केला जातो. मुळात या वाहनांच्या रचनेत फेरफार करण्यास आरटीओकडून परवानगी दिली जात नाही. मात्र, नियम धुडकावून डीजे व्यावसायिक रथ तयार करण्यासाठी वाहनात फेरफार करतात. त्यावर ध्वनिवर्धक यंत्रणा चढवितात. गेल्या काही वर्षांपासून विवाह समारंभात डीजे रथांचा वापर करण्याची पद्धत आली आहे. या रथांच्या समोर नाचणाऱ्यांमुळे वाहतुकीची कोंडी होती. पुणे शहरातील एरंडवणे भागातील डीपी रस्त्यावर अशा रथांमुळे कोंडी झाल्याचे चित्र लग्नसराईत कायम पहायाला मिळते.

पोलिसांनी प्रादेशिक परिवहन कार्यालयाकडे पाठपुरावा केल्यामुळे विसर्जन मिरवणुकीत डीजे रथाचा वापर करणाऱ्या वाहनमालकांवर कारवाई करणे शक्य झाले. पोलिसांनी डीजे रथ जप्त केला. अशा प्रकारे कारवाई केल्यामुळे विसर्जन मिरवणुकीत दणदणाट करणाऱ्या डीजे रथ तसेच ध्वनिवर्धक यंत्रणेचा वापर करणाऱ्या मंडळांना चाप बसेल.

– अनिल पाथ्रुडकर, वरिष्ठ पोलीस निरीक्षक

Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: One lakh fine to dj system in pune
First published on: 29-09-2016 at 02:22 IST