पुणे : कांद्यावरील निर्यातबंदी उठवल्यानंतरही निर्यात शुल्काच्या संभ्रमामुळे बंद असलेली कांदा निर्यात मंगळवारी, ७ मेपासून सुरू झाली. पण, ५५० डॉलरचे किमान निर्यात मूल्य आणि ४० टक्के निर्यात शुल्कामुळे फारसा कांदा निर्यात होण्याची शक्यता नसल्यामुळे दरात पडझड सुरूच आहे.

केंद्र सरकारने चार मे रोजी कांदा निर्यातीवरील बंदी उठवली होती. पण, नेमका निर्यात शुल्क किती, याबाबत संभ्रम असल्यामुळे निर्यात सुरू झाली नव्हती. अखेर मंगळवारी दुपारनंतर सीमा शुल्क विभागाने ४० टक्के दराने निर्यात शुल्क भरून घेण्यास सुरुवात केल्यामुळे देशातून कांद्याची निर्यात सुरू झाली आहे.

निर्यातबंदी उठवताच सहा मे रोजी कांद्याचे दर प्रति क्विंटल १२०० ते १५०० रुपयांवरून २२०० ते २५०० रुपयांवर गेले होते. पण, निर्यात शुल्कातील संभ्रम आणि जागतिक बाजारातील स्पर्धेत भारतीय कांदा टिकू शकणार नसल्याच्या भीतीमुळे पुन्हा कांद्याच्या दरात पडझड झाली आहे. कांद्याचे दर पुन्हा १२०० ते १७०० रुपये प्रति क्विंटलपर्यंत खाली आले आहेत, अशी माहिती विंचूर येथील कांदा व्यापारी आतिश बोराटे यांनी दिली.

हेही वाचा >>>नरेंद्र मोदींच्या विरोधात प्रचंड मोठी लाट – पृथ्वीराज चव्हाण; सांगवीतील जाहीर सभेत महाविकास आघाडीच्या नेत्यांचा मोदी सरकारवर प्रहार

लासलगाव येथील कांदा निर्यातदार मनोजकुमार जैन म्हणाले,‘‘मंगळवार दुपारनंतर ४० टक्के निर्यात शुल्क भरून घेऊन कांद्याची निर्यात सुरू झाली आहे. प्रामुख्याने आखाती देश, श्रीलंका आणि मलेशियाला कांदा निर्यात होत आहे. मुंबईसह नाशिक परिसरात कांदा भरून सुमारे ४०० कंटेनर तयार आहेत. आता जहाजांच्या उपलब्धतेवर निर्यात सुरू राहील’

स्वतंत्र भारत पक्षाचे अध्यक्ष अनिल घनवट म्हणाले, ‘सरकारने कागदोपत्री निर्यातबंदी उठवली आहे. पण, किमान निर्यात मूल्य आणि निर्यात शुल्कांच्या माध्यमातून आडमार्गाने कांदा निर्यात रोखून धरली आहे. केंद्र सरकारला कांदा उत्पादक शेतकऱ्यांना खऱ्या अर्थाने न्याय द्यायचा असेल तर निर्यातीवरील निर्बंध काढून टाकावेत.’

बांगलादेश, म्यानमार आणि श्रीलंकेच्या बाजारपेठत भारतीय कांदा सुमारे १०० ते १२० डॉलरने महाग आहे. कांद्याची जागतिक बाजारपेठ पुन्हा काबीज करायची असल्यास सरकाने निर्यात शुल्क काढून टाकावे. – मनोजकुमार जैन, कांदा निर्यातदार, लासलगाव