खासगी रुग्णालयात स्वाइन फ्लूवरील उपचार घेताना जीवनावश्यक प्रणालीवर ठेवावे लागलेल्या गरीब रुग्णांना उपचार मोफत मिळणार आहेत. २ मार्च व त्यानंतर खासगी रुग्णालयात ‘व्हेंटिलेटर’ (कृत्रिम श्वासोच्छवास) किंवा तत्सम जीवनावश्यक प्रणालीवर ठेवण्यात आलेल्या आर्थिकदृष्टय़ा दुर्बल घटकातील रुग्णांना याचा लाभ मिळेल.
या योजनेचा लाभ केवळ आर्थिकदृष्टय़ा दुर्बल घटकांतील रुग्णांनाच न देता तो सर्वच रुग्णांना दिला जावा असे प्रथम शासनाच्या विचाराधीन होते. बऱ्याच चर्चेनंतर गरीब रुग्णांनाच लाभ मिळावा असे ठरले. मुख्यमंत्री सहायता निधीमधून या योजनेसाठी तीन कोटींचा निधी उपलब्ध करुन देण्यात आला आहे. रुग्णालयाच्या बिलाची करण्यात येणारी प्रतिपूर्ती केंद्र शासनाच्या आरोग्य योजनेतील (सीजीएचएस) दरानुसार असेल असेही या शासन निर्णयात नमूद केले आहे.
आरोग्य खात्यातील एका वरिष्ठ अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार, ‘‘खासगी रुग्णालयाने रुग्णांना बिल न आकारता ते शासनाकडे पाठवायचे आहे. शासन सीजीएचएस दरानुसार अदा करण्याची रक्कम ठरवेल. ही रक्कम जिल्हाधिकाऱ्याकडे पाठवली जाणार असून त्याच्यामार्फत रुग्णालयाला खर्च दिला जाईल. जे रुग्ण सध्या व्हेंटिलेटरवर उपचार घेत आहेत, त्यांच्या बाबतीत रुग्णालयाला खर्च दिला जाईल, तर पूर्वी जे रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत. त्यांच्या बाबतीत रुग्णाला किंवा रुग्ण मृत्यू पावलेला असल्यास जवळच्या नातेवाइकाला खर्चाची प्रतिपूर्ती मिळेल.’’
शासनाने खर्चाच्या प्रतिपूर्तीसाठी स्वतंत्र समिती गठित केली आहे. या समितीत जिल्हाधिकारी, जिल्हा शल्य चिकित्सक, जिल्हा आरोग्य अधिकारी, वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता आणि खासगी रुग्णालयातील प्रमुख अधिकाऱ्यांचा समावेश असेल. जिल्हा शल्य चिकित्सकांमार्फत रुग्णांचे प्रस्ताव सादर होणार असून समिती त्याबाबत मंजुरीचा निर्णय घेणार आहे.

शासन निर्णय निघाला, पण..
या शासन निर्णयातील काही मुद्दय़ांबाबत अडचणी निर्माण होण्याची शक्यताही आरोग्य खात्यातील अधिकाऱ्यांनी वर्तवली. काही खासगी रुग्णालयांनी सीजीएचएस दरासाठी तयारी दर्शवली असली तरी इतर रुग्णालयांचा या दराबाबत आक्षेप असण्याची शक्यता आहे. शिवाय रुग्णालयांना शासन व रुग्ण अशा दोहोंकडून उपचारांचा खर्च वसूल करता येणार नाही. जे रुग्ण उपचार घेऊन घरी गेले आहेत आणि त्यांनी आधीच खासगी रुग्णालयाचे बिल भरले आहे, अशा रुग्णांना मिळणारी सीजीएचएस दराची प्रतिपूर्ती त्यांनी भरलेल्या बिलापेक्षा कमी असू शकेल. हे मुद्दे अद्याप स्पष्ट नाहीत.

स्वाइन फ्लूमुळे पुण्यात एकाचा मृत्यू
स्वाइन फ्लूमुळे पुण्यात सोमवारी एका रुग्णाचा मृत्यू झाला. सध्या स्वाइन फ्लूचे ८० रुग्ण शहरातील रुग्णालयांत दाखल असून त्यातील २१ जणांना व्हेंटिलेटरवर ठेवण्यात आले आहे. आणखी १२ संशयित रुग्णही रुग्णालयांत दाखल आहेत. स्वाइन फ्लूच्या नवीन रुग्णांची संख्या आता कमी झाल्याचे दिसत असून सोमवारी ३ नवीन रुग्ण सापडले.