वर्तमानपत्राचे स्वरूप मागील काही काळापासून झपाटय़ाने बदलले आहे. पूर्वी मथळ्याची बातमी व अग्रलेखाकडे लक्ष असायचे, हल्ली वर्तमानपत्राचा ताबा व्यवहाराने घेतला असल्याने पहिले पान सोडूनच पुढे जावे लागते. अग्रलेखापेक्षा ‘पेज थ्री’ संस्कृती महत्त्वाची वाटते. या बदलाचे नव्या पिढीला आकर्षण वाटत असेल, पण त्यात माझ्यासारखे वाचक ‘आऊटडेटेड’ झाले आहेत, अशी खंत माजी केंद्रीय मंत्री शरद पवार यांनी व्यक्त केली.
पुणे पत्रकार प्रतिष्ठानच्या वतीने नूतनीकरण करण्यात आलेल्या कमिन्स सभागृहाचे उद्घाटन पवार यांच्या हस्ते शनिवारी करण्यात आले, त्या वेळी ते बोलत होते. खासदार अनिल शिरोळे, प्रतिष्ठानचे अध्यक्ष उमेश घोंगडे, कार्यवाह शाम दौंडकर, पुणे श्रमिक पत्रकार संघाचे अध्यक्ष जितेंद्र अष्टेकर त्या वेळी व्यासपीठावर उपस्थित होते.
पवार म्हणाले,‘‘ स्वात्रंत्र्याच्या चळवळीत प्रभावीपणे लेखणी वापरली गेली. वेगळ्या रस्त्यावर जाणाऱ्या सरकारला ‘सरकारचे डोके ठिकाणावर आहे का’, असे ठणकावणारी लोकमान्यांची पत्रकारिता सर्वाना माहीत आहे. पत्रकारितेच्या या इतिहासात लोकमान्यांनंतरही अनेकांनी योगदान दिले. मात्र, आता वृत्ताला व मताला प्राधान्य नसते. पहिल्या पानावर काय बातमी असेल, याची पूर्वी प्रचंड उत्सुकता असायची. व्यावसायिकतेच्या काळामध्ये आता पहिले पान सोडूनच पुढे जावे लागते. अग्रलेखाचे स्थानही दुय्यम झाले आहे.’’
दिल्लीतील प्रवासात एका इंग्रजी दैनिकाचा संपादक भेटल्याचा किस्सा सांगताना पवार म्हणाले,‘‘ एका मोठय़ा वर्तमानपत्राचे संपादक असूनही त्यांचे नाव मला माहीत नव्हते. मी त्यांना अग्रलेखाबाबत विचारले असता, आता अग्रलेखाची गरज नसून, पेज थ्री महत्त्वाचे असल्याचे त्यांनी सांगितले. त्यामुळे या सर्वामध्ये माझ्यासारखे वाचक ‘आऊटडेटेड’ झाले आहेत. केवळ आकर्षक रंगसंगतीत न रमता मराठी पत्रकारितेतील उज्ज्वल परंपरा जपायला हव्यात. वाचकांना न्याय मिळवून देण्यासाठी पत्रकारितेने एखादी भूमिका घेतली, तर शासकीय निर्णय बदलावे लागतात, याची उदाहारणे आहेत. हा दृष्टिकोन घेऊन काम करणाऱ्या अभ्यासपूर्ण पत्रकारितेच्या श्रमिक पत्रकार परंपरेचे जतन झाले पाहिजे.’’

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

माझ्यासमोर भूखंडाची आठवण.. अाश्चर्य नाही!

पत्रकार संघाच्या इमारतीसाठी शरद पवार यांनी मुख्यमंत्री असताना जागा मिळवून दिल्याचा उल्लेख प्रास्ताविकात करण्यात आला होता. त्यावर बोलताना पवार मिस्कीलपणे म्हणाले,‘‘ मी व्यासपीठावर असताना पत्रकारांना भूखंडाची आठवण झाली नाही, तर अश्चर्य नाही.’’ मात्र, अशाच पद्धतीने चांगले काम करणाऱ्या संस्थांनाच भूखंड देण्यासाठी आम्ही सत्तेचा वापर केल्याचीही टिपण्णी त्यांनी केली. वसंतराव नाईक मुख्यमंत्री असताना पत्रकारांच्या निवासासाठी भूखंड देण्याचा विषयही माझ्या अखत्यारीतच होता. त्यासाठी आपण जास्तच आग्रही असल्याने नाईक यांनी आपल्याकडे त्याबाबत विचारणा केली. तेव्हा सरकारच्या धोरणानुसार भटक्यांना स्थिर करण्यासाठी निवारा दिलाच पाहिजे, असे उत्तर आपण दिले असल्याचे सांगताच सभागृहात हास्यकल्लोळ झाला.

Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Opening of cummins hall by sharad pawar
First published on: 20-12-2015 at 03:26 IST