मिळकत कर थकवलेल्या शहरातील बडय़ा थकबाकीदारांवर महापालिकेने धडक कारवाई सुरू केली असून या कारवाईत शनिवारी बालेवाडी येथील ऑर्चिड या पंचतारांकित हॉटेलवर कारवाई करण्यात आली. या हॉटेलकडे १६ कोटी २८ लाखांची थकबाकी असल्यामुळे हॉटेल ‘सील’ करण्यात आले. प्रसिद्ध हॉटेल व्यावसायिक विठ्ठल कामत हे या हॉटेलचे संचालक आहेत.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

कर आकारणी व कर संकलन कार्यालयामार्फत शनिवारी सहायक कर आकारणी व कर संकलन प्रमुख वैभव कडलख यांच्या नेतृत्वाखाली महापालिकेच्या अधिकाऱ्यांनी ही कारवाई केली. हॉटेल ऑर्चिडकडे मिळकत कराची १६ कोटी ६७ लाख ५६ हजार ४२२ रुपये इतकी थकबाकी आहे. अभय योजनेअंतर्गत हॉटेलला चार कोटी ६० लाख ७६ हजार ६८४ रुपये सवलत देण्यात आली होती. उर्वरित रक्कम संबंधितांनी भरणे बाकी होते. ही थकबाकी २००८ सालापासूनची आहे. दरवर्षी मिळकत कर विभागातर्फे थकित रक्कम वसुलीसाठी प्रयत्न केले जात होते. त्यानुसार हॉटेल व्यवस्थापनाकडून साडेतीन कोटी रुपये जमा करण्यात आले होते. मात्र उर्वरित थकबाकी देण्यास सातत्याने टाळाटाळ केली जात होती. यंदाही वसुलीसाठी हॉटेलला नोटिसा देण्यात आल्या होत्या. मात्र थकबाकी भरण्यास असमर्थता दाखवण्यात आल्यामुळे शनिवारी विशेष पथकाने थकबाकी वसुलीसाठी हे हॉटेल ‘सील’ केले. महापालिकेने प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात ही माहिती देण्यात आली आहे.

Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Orchid hotel seal by municipal corporation
First published on: 06-11-2016 at 02:11 IST