गेल्या काही दिवसांपासून जिल्ह्यात सर्वदूर मुसळधार पावसाने हजेरी लावली आहे. पावसामुळे जिल्ह्यात पडझडीच्या दुर्घटना घडत असल्याने जिल्हा परिषदेने तात्काळ धोकादायक इमारती, घरांचा शोध घेण्याचे आदेश १३०० हून अधिक ग्रामपंचायतींना देण्यात आले आहेत. त्यांचा शोध घेऊन तेथील नागरिकांना सुरक्षित ठिकाणी स्थलांतरित करण्यासही सांगण्यात आले आहे.

जुन्नर, आंबेगाव, मावळ, मुळशी, भोर आणि वेल्हा या तालुक्यांमध्ये प्रामुख्याने पावसामुळे पडझड, दरड कोसळण्याच्या घटना अधिक घडण्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे. त्यामुळे जिल्हा परिषदेच्या पंचायत विभागाने या तालुक्यांतील गावांवर लक्ष केंद्रित केले आहे. ग्रामसेवक, तलाठी, तसेच ग्रामपंचायतीच्या कर्मचाऱ्यांना याबाबत सर्वेक्षण करण्याच्या सूचना दिल्या गेल्या आहेत. या पूर्वी खेड तालुक्यात अशा प्रकारची घटना घडली होती.

घाट परिसरातील तालुक्यांमध्ये मुसळधार पाऊस, काही ठिकाणी अतिवृष्टी होत आहे. या भागात दरड कोसळण्याच्या घटना घडण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे अनेक भागातील रस्ते बंद करण्यात आले आहेत. रस्त्यांतील अडथळे दूर करण्याचे काम जिल्हा प्रशासनाकडून करण्यात येत आहे. या पार्श्वभूमीवर आपत्ती व्यवस्थापनाची बैठक घेऊन धोकादायक इमारती, घरे याबाबत सर्वेक्षण करण्याचे ठरविण्यात आले आहे. जिल्ह्यातील जुन्नर, आंबेगाव, मावळ, मुळशी, भोर आणि वेल्हा या तालुक्यांमध्ये प्रामुख्याने पावसामुळे पडझड, दरड कोसळण्याच्या घटना घडण्याची शक्यता असल्याने या तालुक्यांमधील गावांवर लक्ष केंद्रित करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.

जिल्हाधिकारी यांनी घेतलेल्या बैठकीत ग्रामपंचायतींना धोकादायक इमारती, घरांचा शोध घेण्याच्या सूचना देण्याचे आदेश दिले होते, तसेच धोकादायक घर आढळल्यास संबंधित कुटुंबाला स्थलांतरित करण्यासाठी जिल्हा परिषदेला निधी मिळणार आहे. – आयुष प्रसाद, मुख्य कार्यकारी अधिकारी तथा प्रशासक, जिल्हा परिषद