डॉ. माधवराव चितळे यांचा सवाल
‘आपलं आणि पाण्याचं नातं बदलत असून, या काळात पाण्याचा समन्वित व काटकसरीने वापर करणारा समाज निर्माण करणे आणि त्यांच्यात सहयोग कसा असेल ते पाहणे हे आपल्यापुढील आव्हान आहे,’ असे प्रतिपादन ज्येष्ठ जलतज्ज्ञ डॉ. माधवराव चितळे यांनी बुधवारी केले आणि या कसोटीच्या काळात आपण बदलणार का, हा प्रश्न उपस्थित केला.
‘लोकसत्ता-लाऊडस्पीकर’ च्या व्यासपीठावर दुष्काळ व पाणीटंचाईचा वेध घेणाऱ्या ‘दुष्काळ- मानवनिर्मित की निसर्गनिर्मित?’ या परिसंवादाचे पुण्यात आयोजन करण्यात आले होते. त्यात अध्यक्षस्थानावरून ते बोलत होते. या परिसंवादात राज्याच्या जलसंपदा विभागाचे निवृत्त सचिव व सिंचन सहयोग या संस्थेचे अध्यक्ष डॉ. दि. मा. मोरे, महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाचे माजी सदस्य सचिव व राज्याच्या नागरी शहरी पाणीपुरवठा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष डॉ. संजय दहासहस्र, जलव्यवस्थापनाद्वारे ‘हिवरे बाजार’ या गावाचा कायापालट करणारे व आदर्श गाव योजनेचे अध्यक्ष पोपटराव पवार यांनीही भाग घेतला. या वक्तयांबरोबरच विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते.
वेगवेगळ्या ठिकाणी पाणी वापरताना त्याचा वेगवेगळा विचार करावा लागतो. आता बदलत्या काळात शेतीबरोबरच पाण्याचा इतरत्र कसा वापर करावा लागतो, याचा एकत्रित विचार करून नियोजन करावे लागेल. तसे केले नसल्यानेच ऐनवेळी पाणीटंचाईसारख्या समस्यांना सामोरे जावे लागते. आपलं पाण्याशी नातं बदलत असताना ते आवश्यक आहे. त्याचबरोबर समाजाचा सहयोग कसा वाढेल यावरच भवितव्य अवलंबून आहे, असे चितळे म्हणाले.
डॉ. मोरे म्हणाले की, कमी पावसाच्या प्रदेशात ज्या गावांत ऊस आहे तिथेच टँकर आहेत. बाराशे-चौदाशे फूट खोल बोअर टाकून उसासाठी पाणी उपसले जाते, त्याला कोणताही प्रतिबंध केला जात नाही. मग पिण्यासाठी विहिरीतून पाणी कसे मिळेल? वास्तविक जिथे पाण्याची उपलब्धता आहे तिथे साखर कारखाने क्रमाक्रमाने स्थलांतरित करण्याची गरज आहे, ते शक्यही आहे.
अनेक ठिकाणी पाणीपुरवठय़ासाठीचे नकाशे उपलब्ध नाहीत. पाण्याला मीटर नाहीत. मग पाण्याची टंचाई का भेडसावणार नाही, असा प्रश्न डॉ. दहासहस्र यांनी उपस्थित केला.
सध्याच्या दुष्काळाला सामोरे जाणे शक्य आहे. लोकप्रतिनिधीही पाण्याच्या बाबतीत मतदार संघापुरताच दृष्टिकोन ठेवतात. आयोग पुष्कळ झाले, त्यांची अंमलबजावणी गरजेची आहे, असे पवार म्हणाले.
‘लोकसत्ता-लाऊडस्पीकर’ च्या व्यासपीठावर दुष्काळ व पाणीटंचाईचा वेध घेणाऱ्या ‘दुष्काळ- मानवनिर्मित की निसर्गनिर्मित?’ या परिसंवादामध्ये ज्येष्ठ जलतज्ज्ञ डॉ. माधवराव चितळे, डॉ. दि. मा. मोरे, डॉ. संजय दहासहस्र आणि  पोपटराव पवार .