शिक्षण प्रसारक मंडळी संस्थेच्या विश्वस्त मंडळात आता अकरा वर्षांनंतर ‘परिवर्तन’ झाले आहे. संस्थेतील प्रस्थापितांची मक्तेदारी मोडून काढत निवडणुकीत परिवर्तन पॅनेलचे बाराही उमेदवार निवडून आले आहेत. संस्थेच्या निवडणुकीचे निकाल गुरूवारी जाहीर झाले.
गेले काही दिवस गाजणाऱ्या शि. प्र. मंडळीच्या निवडणुकीचा निकाल गुरूवारी जाहीर झाला. या निवडणुकीत परिवर्तन पॅनेल, शिक्षणप्रेमी पॅनेल आणि लोकमान्य पॅनेल असे तीन गट आणि वैयक्तिक उमेदवार अशा एकूण ४३ उमेदवारांमध्ये लढत रंगली. त्यातून बारा उमेदवारांची निवड करायची होती. गेल्या अकरा वर्षांची प्रस्थापितांची सत्ता मोडीत काढून परिवर्तन पॅनेल या निवडणुकीत मोठय़ा फरकाने विजयी झाले. विश्वस्त मंडळावर निवडून आलेले सर्व उमेदवार परिवर्तन पॅनेलचे आहेत. या निवडणुकीसाठी एकूण ३ हजार ५०४ मतदारांची नोंद होती. त्यापैकी १ हजार ५१ मतदारांनी मतदान केले होते. मुंबई, पुणे, सोलापूर या तीन ठिकाणी प्रत्यक्ष मतदान आणि पोस्टल मतदान घेण्यात आले. त्यामध्ये सोलापूर वगळता इतर सर्व ठिकाणी परिवर्तन पॅनेलला मताधिक्य मिळाले. एकूण मतांपैकी जवळपास ७५ टक्क्य़ांपेक्षा अधिक मते या पॅनेलला मिळाली.
परिवर्तन पॅनेलमध्ये ९ उमेदवार पुणे येथील, २ सोलापूर येथील, तर १ उमेदवार मुंबई येथील आहे. या निवडणुकीत सर्वाधिक मते श्रीकृष्ण चितळे (८६७) यांना मिळाली आहेत. या शिवाय परिवर्तन पॅनेलचे वसंत देसाई (७६३), पुरूषोत्तम कुलकर्णी (७५७), केशव वझे (७५१), राजेश पटवर्धन (७४४), जयंत किराड (७४२), माधुरी मिसाळ (७३४), अॅड. मिहिर प्रभुदेसाई (७१७), सोहनलाल जैन (७१६), सुरेश देवळे (६९८), दामोदर भंडारी (६९१), सतीश पवार (६८५) हे उमेदवार निवडून आले.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

दृष्टिक्षेपात निवडणूक
– अकरा वर्षांनंतर सत्ताबदल
– परिवर्तन पॅनेलचे बाराही उमेदवार विजयी
– बोगस मतपत्रिका सापडल्याप्रकरणी निवडणूक चर्चेत
– निवडणुकीच्या प्रक्रियेतील गैरप्रकारांमुळे पहिल्यांदाच पोलिस कारवाई
– माजी अध्यक्ष, विश्वस्तांना अटक

‘‘संस्थेच्या कामकाजात पारदर्शकता आणणे हेच आमचे उद्दिष्ट आहे. गेल्या काही वर्षांत संस्थेवर अनेक आर्थिक गैरप्रकारांचे आरोप झाले. त्या पाश्र्वभूमीवर संस्थेची घडी बसवण्याचे आव्हान संस्थेपुढे आहे. संस्थेकडे मोठय़ा प्रमाणावर जागा आहे. अनेक ठिकाणी शाळा, महाविद्यालये आहेत. त्यांचा विकास करण्याबरोबरच शिक्षणातील नवे प्रवाह, सामाजिक गरजा लक्षात घेऊन नवी महाविद्यालये उभी करणे, नवे अभ्यासक्रम सुरू करणे यासाठी प्राधान्य आहे. याबाबतची रुपरेषा संस्थेची कार्यकारिणी निश्चित झाल्यानंतर ती ठरवेल.’’
– सूर्यकांत पाठक, परिवर्तन पॅनेल, सुकाणू समिती प्रमुख

Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Parivartan panel wins s p m election
First published on: 01-04-2016 at 03:32 IST