साधारण नव्वदच्या दशकानंतर उंबरा ओलांडून दिवाणखान्यात आलेले प्राणी कुटुंबातील एक भाग झाले. बदललेली बाजारपेठ, जीवनशैली यानुसार माणसाच्या एकटेपणावर उत्तर म्हणूनही कुत्रा आणि मांजरांना आयुष्यात अविभाज्य स्थान मिळाले. समाजातील एका स्तराने हा बदल फार झपाटय़ाने स्वीकारला. दिवसभर नोकरी, काम याच्या मागे धावणाऱ्या अनेक जोडप्यांच्या आयुष्यातला तिसरा कोपरा हा स्वत:च्या अपत्याऐवजी प्राण्याच्या रूपाने पूर्ण होण्याचा ट्रेंडही वाढला. प्राण्यांमधील मानसिक गुंतवणूक, त्याला आर्थिक जोड आणि पशुपालकत्वाला मिळालेले वलय यातून मुलाचे पालकत्व स्वीकारताना उभी राहणारी आव्हाने प्राण्याचे पालकत्व स्वीकारतानाही जाणवू लागली. मुलाच्या संगोपनासाठी आईला किती रजा असावी, वडिलांना रजा द्यावी का याच्या धोरणात्मक चर्चा एकीकडे सुरू असताना ‘पशुपालकत्वासाठी’ रजा या नव्या संकल्पनेने पाश्चिमात्य देशांतून भारतात प्रवेशही केला.
मुलाच्या जन्माच्या वेळी आईला रजा दिली जाते. मुलाच्या संगोपनासाठी वडिलांनाही त्यांच्या नोकरीतून रजा मिळते. मग मुलाच्या जागी मानण्यात आलेल्या घरातील पाळीव प्राण्याच्या संगोपनासाठी सुट्टी का नाही? भारतीय मानसिकतेत ‘चोचले’ या गटात मोडणारा हा प्रश्न. पण अनेक देशांतील उद्योगांनी हा प्रश्न सकारात्मकपणे स्वीकारला आणि त्यावर तोडगाही काढला. त्यातूनच ‘पॉटर्निटी लीव्ह’ म्हणजेच पशुसंगोपन रजा देण्याचा पर्याय समोर आला. कुत्रा, मांजर, पक्षी, किंवा हॅमस्टर्ससारखे छोटे प्राणी असोत. ते घरी आणल्यानंतर त्यांनाही रुळायला वेळ लागतो. एखाद्या नव्या जागेत गेल्यावर लाहान मूल जसे आईला चिकटून असते, त्याला सुरक्षित वाटेपर्यंत त्याला आधाराची गरज असते. तसेच काही अंशी प्राण्यांचेही असते. पिल्लू त्याच्या आईपासून वेगळे झालेले असते. त्याच्या सवयी बदललेल्या असतात, वातावरण बदललेले असते अशा वेळी त्याला घरात रुळण्यासाठी, सवय होण्यासाठी त्याला वेळ द्यावा लागतो. त्यातूनच प्राणी आणि पालकाचे नाते तयार होत असते. त्यासाठीच प्राणी पाळणाऱ्या कर्मचाऱ्यांना ‘पशुसंगोपनासाठी सुट्टी देण्याचा निर्णय अमेरिका आणि ब्रिटनमधील काही कंपन्यांनी घेतला आहे.
संकल्पनेचे उगमस्थान
पशुसंगोपनाच्या बाजारपेठेत सगळ्या नव्या ट्रेंडची रुजुवात करणाऱ्या अमेरिकेतच ‘पॉटर्निटी लीव्ह’चे उगमस्थान. खरेतर हा ट्रेंड सुरू झाला तो बाजारपेठेचा किंवा प्रसिद्धी तंत्राचा एक भाग म्हणून. प्राण्यांसाठी खाणे आणि इतर उत्पादने तयार करणाऱ्या ‘मार्स पेटकेअर’ या कंपनीने पहिल्यांदा आपल्या कर्मचाऱ्यांसाठी पशुसंगोपन रजा देण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर इतरही पशू उत्पादनांच्या कंपन्या पुढे आल्या आणि हळूहळू अनेक कंपन्यांनी अशी रजा सुरू केली. मार्स पेटकेअरने २०१२ मध्ये हे पाऊल उचलले आणि अवघ्या पाच वर्षांत झपाटय़ाने ही संकल्पना फोफावली. अमेरिकेतील माहिती तंत्रज्ञान क्षेत्रातील (आयटी) अनेक छोटय़ा, मोठय़ा कंपन्या, हॉटेल्स, आरोग्य क्षेत्रातील कंपन्या अशी रजा देतात. अमेरिकेपाठोपाठ कॅनडा, ऑस्ट्रेलिया या देशांतही ही पद्धत सुरू झाली. पण खऱ्या अर्थाने ही पद्धत उचलून धरली ती ब्रिटन येथील कंपन्यांनी. प्राणी घरी आणल्यानंतर २ ते ८ दिवस रजा या कंपन्या देतात. त्याचबरोबर काही कंपन्यांनी पशुपालकांसाठी कामाच्या वेळा लवचिक ठेवल्या आहेत. पशुवैद्याकडे प्राण्यांना नेण्यासाठी वेगळ्या रजेची तरतूद करण्यात आली, तर काहींनी सरसकट आठवडय़ातील एक दिवस अतिरिक्त सुट्टी द्यायला सुरुवात केली. या सगळ्याबरोबरच प्राण्याच्या मृत्यूनंतरही आठ दिवसाची रजा देण्याचा प्रघात अनेक परदेशी कंपन्यांमध्ये पाळला जातो. बाजारपेठेचा अभ्यास करणाऱ्या एका खासगी कंपनीने केलेल्या पाहणीनुसार ब्रिटनमध्ये साधारण ५ टक्के कंपन्या पशुसंगोपन रजा किंवा त्यासाठी अतिरिक्त सवलती देतात.
अशाच दुसऱ्या एका कंपनीने केलेल्या पाहणीतून अशी रजा देण्याची काही गमतीदार वाटावीत अशी कारणेही पुढे आली आहेत. प्राण्याला घरी एकटे सोडल्यानंतर कर्मचाऱ्यांचे कामात लक्ष नसते. प्राण्याच्या संगोपनासाठी रजा हवी आहे हे कारण मान्य होत नसल्यामुळे कर्मचारी खोटी कारणे देऊन रजा घेतात. एकटय़ा राहणाऱ्या कर्मचाऱ्यांपेक्षा पशुपालकांची कार्यक्षमता अधिक असल्याचे लक्षात आले. त्यामुळे कर्मचाऱ्यांनी एकटे राहण्यापेक्षा प्राणी पाळावेत अशी अनेक कारणे कंपन्यांनी नमूद केली. या रजेचाच पुढचा भाग म्हणून पाळणाघराप्रमाणेच कंपन्या पशू पाळणाघराचीही सुविधा पुरवतात.
भारतात शिरकाव..
भारतात अवघ्या दोन महिन्यांपूर्वी ‘पॉटर्निटी लीव्ह’चा शिरकाव झाला. जागतिक प्रकाशन व्यवहारात जवळपास २०० वर्षे जुन्या असलेल्या ‘हार्पर कोलिन’ या प्रकाशन संस्थेने त्यांच्या भारतातील कार्यालयात पशुसंगोपनासाठी रजा देण्याची सुरुवात केली. या प्रकाशनाच्या नोएडा येथील कार्यालयात कुत्रे, मांजर, छोटे प्राणी किंवा पक्षी अशा कशाचेही पालकत्व स्वीकारलेल्या कर्मचाऱ्यांसाठी पाच दिवसांच्या आठवडय़ाचीही तरतूद या कंपनीने केली आहे. त्याचबरोबर पालकांना एकटे प्राणी घरी सोडणे शक्य नसल्यास त्यांना कार्यालयात घेऊन येण्याचीही मुभा देण्यात आली आहे.
अद्याप भारतात सर्वदूर पशुसंगोपन रजेचा प्रघात पसरला नसला तरी एका नव्या ट्रेंडची सुरुवात झाली आहे. भारतात पाळीव प्राण्यांना मिळणारी स्वीकारार्हता पाहता मानसिकता झपाटय़ाने बदलण्याच्या दिशेने हे पाऊल ठरू शकते.
