पिंपरी-चिंचवड शहरातील उद्यानांच्या अडचणींबाबत ‘लोकसत्ता’ ने प्रसिद्ध केलेल्या वृत्ताची पालिका आयुक्त डॉ. श्रीकर परदेशी यांनी गंभीर दखल घेतली आहे. स्थापत्य विभागाचे कार्यकारी अभियंता सतीश इंगळे यांना याबाबतची सविस्तर माहिती घेऊन अहवाल सादर करण्याचे आदेश आयुक्तांनी दिले असून, तो प्राप्त झाल्यानंतर आवश्यक ती कारवाई करण्याचे संकेत आयुक्तांनी दिले आहेत.
पिंपरी पालिकेच्या स्थापनेपासून शहराने घेतलेला हिरवाईचा वसा आजही कायम आहे. प्रत्येक प्रभागात उद्यान उभारण्याचा संकल्प असलेल्या महापालिकेने आतापर्यंत १५४ उद्याने बांधली आहेत. उद्यानांच्या संख्या वाढत असतानाच त्यापुढील अडचणींचे प्रमाणही वाढते आहे. पुरेसे बजेट नाही, कर्मचाऱ्यांची विशेषत: सुरक्षा कर्मचाऱ्यांची संख्या नगण्य आहे. माळ्यांची कमतरता आहे. निवृत्त कर्मचाऱ्यांच्या जागांवर नवे मिळत नाहीत. स्थापत्याची कामे होतच नाहीत. दुरुस्त्यांची कामे रखडून पडतात. साधी फरशी बसवायची म्हटले तरी पत्रव्यवहार करावा लागतो. याशिवाय, ठरावीक ठेकेदारांची मक्तेदारी, उद्यानांमध्ये होणाऱ्या चोऱ्यामोऱ्या असे अनेक मुद्दे असलेले ‘वाढत्या उद्यानांपुढे अडचणींचा डोंगर’ हे सविस्तर वृत्त लोकसत्ताने प्रसिद्ध केले होते. त्याची दखल घेत आयुक्तांनी उद्यानांमधील सद्य:स्थितीचा अहवाल तीन दिवसांत सादर करण्याचे आदेश कार्यकारी अभियंत्यांना दिले आहेत. त्यानुसार, नव्या वर्षांच्या प्रारंभी हा अहवाल प्राप्त होईल आणि त्यानंतर आवश्यक ती कारवाई आयुक्त करतील, असे सांगण्यात आले.