‘गावकी-भावकी’चे राजकारण
चर्चेतील प्रभाग – प्रभाग क्रमांक- ३०
दापोडी-फुगेवाडी-कासारवाडी
दापोडी, फुगेवाडी आणि कासारवाडी अशा तीन गावांच्या या प्रभागात सहा नगरसेवक, तीन माजी नगरसेवक व दोन माजी नगरसेवकांच्या पत्नी रिंगणात आहेत. उमेदवारीवरून सर्वच पक्षांत नाटय़मय घडामोडी झाल्या. इकडचा तिकडे आणि तिकडचा इकडे, अशा उमेदवारांच्या कोलांटउडय़ा दिसून आल्या. खुल्या गटात ‘वजनदार’ काटे परिवारातील उमेदवारांमध्ये ‘काटय़ाची टक्कर’ आहे. गेल्या वेळी राष्ट्रवादीच्या तिकिटावर निवडून आलेले तीन नगरसेवक यंदा तीन वेगवेगळ्या पक्षाचे उमेदवार आहेत. ‘गावकी-भावकी’च्या राजकारणात ‘क्रॉस वोटिंग’ला पर्याय नसल्याचे स्पष्टपणे दिसून येते.
खुल्या गटात दहा उमेदवार रिंगणात आहेत. भाजपकडून राजेंद्र काटे, शिवसेनेकडून संजय काटे, राष्ट्रवादीकडून रोहित काटे हे तीन नगरसेवक आमनेसामने आहेत. स्वीकृत प्रभाग सदस्य सतीश काटे यांनी बंडखोरी केली आहे. कासारवाडीतील राष्ट्रवादीचे नगरसेवक किरण मोटे यांचे चुलत बंधू व माजी नगरसेवक एकनाथ मोटे यांचे चिरंजीव अमोल मोटे अपक्ष रिंगणात आहेत. काँग्रेसकडून इस्ताक शेख यांची उमेदवारी आहे.
राजेंद्र, संजय, रोहित आणि सतीश हे चारही काटे मूळचे राष्ट्रवादीचे आहेत. एकालाच उमेदवारी मिळणार होती, ती रोहित काटे यांना मिळाली. इतरांनी मिळेल त्या पक्षाचे चिन्ह पदरात पाडून घेतले. भाजप नेत्यांची संजय काटे यांना उमेदवारी देण्याची योजना होती. मात्र, राजेंद्र काटे यांची तत्परता फळाली आल्याने त्यांना ‘कमळ’ मिळाले. अपक्ष लढण्याच्या मन:स्थितीत असलेल्या संजय काटे यांना खासदार श्रीरंग बारणे यांच्या पुढाकाराने शिवसेनेचा ‘बाण’ मिळाला. माजी आमदार अण्णा बनसोडे यांना सतीश काटे यांनी उमेदवारी मिळवून देण्यात दुसऱ्यांदा अपयश आले.
त्यामुळे सतीश यांनी पुन्हा बंडखोरी केली आहे. राजेंद्र काटे यांचा काँग्रेस-राष्ट्रवादी-भाजप असा, तर संजय काटे यांचा काँग्रेस-राष्ट्रवादी-शिवसेना असा पक्षीय प्रवास झाला आहे.
काटय़ांच्या या लढतीत कोणाची वर्णी लागते, याविषयी सर्वानाच उत्कंठा आहे.
सर्वसाधारण महिला गटात माजी नगरसेविका स्वाती काटे आणि माजी नगरसेवक अविनाश काटे यांच्या पत्नी अनुजा यांच्यात मुख्य सामना आहे. स्वाती काटे मूळच्या काँग्रेसच्या आहेत. त्यांची भाजपची उमेदवारी निश्चित होती. मात्र, राष्ट्रवादीकडून ‘ऑफर’ येताच त्यांनी घडय़ाळाचा पर्याय निवडला. शिवसेनेच्या छाया तुषार नवले, काँग्रेसच्या नसरीन शेख यांच्यासह माजी नगरसेवक विजय लांडे यांच्या पत्नी वैशाली, दीपाली संजय कणसे अशा सात जणी रिंगणात आहेत. अनुसूचित गटात रिपाइंच्या विद्यमान नगरसेविका चंद्रकांता सोनकांबळे भाजपचे ‘कमळ’ चिन्ह घेऊन रिंगणात आहेत.
शिवसेनेने गोपाळ मोरे, राष्ट्रवादीने राजू बनसोडे, काँग्रेसने सिकंदर सूर्यवंशी, बहुजन मुक्ती पार्टीने संतोष सोनोने यांना संधी दिली. माजी नगरसेवक सनी ओव्हाळ यांनी बंडखोरी केली असून आठ जण रिंगणात आहेत.
ओबीसी महिला गटात भाजपने नगरसेविका आशा शेंडगे यांना, राष्ट्रवादीने प्रतिभा जोशी यांना तर शिवसेनेने शुभांगी प्रवीण गायकवाड यांना उमेदवारी दिली. नगरसेविका संध्या गायकवाड तसेच माजी नगरसेविका सुषमा गावडे यांनी बंडखोरी केली आहे. मोटे, गायकवाड व ओव्हाळ यांनी स्वतंत्र पॅनेल केले आहे. एकूणच सर्वच गटात रंगतदार लढती आहेत.
* तीन विद्यमान नगरसेवक समोरासमोर
* दोन नगरसेविका आमने-सामने
* गावकी-भावकीचे राजकारण
* क्रॉस व्होटिंगची दाट शक्यता
