पुणे : जमीन अकृषिक (नॉन अग्रीकल्चर – एनए) झाली असली, तरी नागरिकांना गावठाणाबाहेरील बांधकामासाठी तसेच विकासकामांसाठी पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाची (पुणे मेट्रोपोलिटन रिजन डेव्हलपमेंट अ‍ॅथॉरिटी – पीएमआरडीए) परवानगी बंधनकारक असल्याचे प्राधिकरणाकडून बुधवारी स्पष्ट करण्यात आले आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

शासनाने गावठाणापासून २०० मीटरच्या आतील जमीनमालकांना अकृषिक परवान्याच्या (एनए) परवानगीची आवश्यकता असणार नाही. केवळ जमीनमालकांनी अकृषिक कराचे चलन भरल्यानंतर त्यांना सनद मिळणार आहे, असा निर्णय घेतला आहे. या निर्णयावर काही नागरिकांच्या मनात संभ्रम निर्माण झाला आहे की, आता जमीन अकृषिक झाली तर बांधकाम परवानगी घेण्याची आवश्यकता नाही. तसेच काही अनधिकृत बांधकाम करणाऱ्यांनी जमीन अकृषिक झाली, असे सांगत बेकायदा प्लॉटिंग करण्यास सुरुवात केली. यामधून नागरिकांची फसवणूक होण्याची शक्यता आहे. या पार्श्वभूमीवर गावठाणाबाहेरील २०० मीटर हद्दीतील जमीन मालकांना अकृषिक वापर सुरू करण्यापूर्वी तहसीलदार यांच्याकडून अकृषिक कर आकारणी करून अकृषिक कर व रुपांतरीत कर भरायचा आहे. त्यानंतर सनद प्राप्त करून घेणे आणि त्यासोबतच पीएमआरडीएकडूनही महाराष्ट्र प्रादेशिक व नगर नियोजन अधिनियम १९६६ मधील तरतुदीनुसार विशेष नियोजन प्राधिकरण म्हणून पीएमआरडीएची विवक्षितरीत्या विकास / बांधकाम परवानगी घेणे अनिवार्य आहे. पीएमआरडीएने जमीन अकृषिक झाली असली, तरी बांधकाम परवानगी घेणे बंधनकारक असल्याचे बुधवारी स्पष्ट केले.

Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Permission required construction development work outside village pmrda outspokenness ysh
First published on: 21-04-2022 at 00:02 IST