लोकसत्ता प्रतिनिधी

पुणे : कल्याणीनगर अपघात प्रकरणात अल्पवयीन मुलाबरोबर मोटारीत असलेल्या चालकाला धमकाविल्याप्रकरणी दाखल गुन्ह्यात अल्पवयीन मुलाचे बांधकाम व्यावसायिक वडील विशाल अगरवाला याला अटक करण्यास न्यायालयाने परवानगी दिली. अतिरिक्त सत्र न्यायाधीश एस. एस. गुल्हाणी यांनी याबाबतचे आदेश दिले. या प्रकरणात अटक केल्यानंतर विशाल अगरवालला मंगळवारी (२८ एप्रिल) न्यायालयात हजर करण्यात येणार आहे.

विशाल सध्या येरवडा कारागृहात न्यायालयीन कोठडीत आहे. या गुन्ह्यात येरवडा कारागृहातूनच विशालला ताब्यात घेण्यासाठी परवानगी मिळावी, असा अर्ज सरकारी वकील प्रेमकुमार अगरवाल यांनी न्यायालयात दिला. अतिरिक्त सत्र न्यायाधीश गुल्हाणी यांनी त्यांचा अर्ज मंजूर केला.

आणखी वाचा-Pune Accident : आरोपीच्या रक्ताच्या नमुन्यांमध्ये फेरफार, ‘ससून’मधील ‘त्या’ दोन्ही डॉक्टरांना ३० मेपर्यंत कोठडी; न्यायालयात काय घडलं?

गेल्या रविवारी (१९ मे) कल्याणीनगर भागात भरधाव मोटारीने दुचाकीस्वार संगणक अभियंता आणि त्याच्या मैत्रिणीला धडक दिली. अपघातात दोघांचा मृत्यू झाला. अपघातानंतर मोटारचालक गंगाधर हेरीक्रुब यांना विशाल अगरवाल आणि त्याचे वडील सुरेंद्र यांनी धमकावले. अल्पवयीन मुलगा मोटार चालवित नव्हता. अपघात माझ्याकडून झाला, असा जबाब पोलिसांना दे. त्याबदल्यात तुझ्या सर्व मागण्या पूर्ण करू, तसेच तुला पैसे देऊ, असा दबाव टाकण्यात आला. गंगाधर यांनी नकार दिल्यानंतर अगरवाल यांनी त्याला मोटारीतून त्यांच्या बंगल्यात नेले. दोन दिवस त्यांना बंगल्यात डांबून ठेवले. त्यांचा मोबाइल संच काढून घेतला. अपघातानंतर मोटारचालक गंगाधर दोन दिवस घरी परतले नाही. तेव्हा त्यांचे कुटुंबीय अगरवाल यांच्या बंगल्यात गेले. बंगल्यात कुटुंबीयांनी आरडाओरडा केल्यानंतर गंगाधर यांना सोडून देण्यात आले. याप्रकरणी अगरवाल यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला.