महात्मा गांधी, क्रांतीज्योती महात्मा फुले आणि इतर अनेक राष्ट्रपुरुष, विचारवंत यांच्याबाबत बदनामीकारक वक्तव्य करून सामाजिक तेढ निर्माण केल्याचा आरोप करत गांधीजींचे पणतू तुषार गांधी व इतर सामाजिक कार्यकर्त्यांनी संभाजी भिडेंविरोधात आज (१५ सप्टेंबर) पुण्यातील शिवाजीनगर न्यायालयात फौजदारी खटला दाखल केला. २७ जुलै २०२३ रोजी अमरावती येथे आयोजित कार्यक्रमात संभाजी भिडेंनी महात्मा गांधी, त्यांच्या कुटुंबातील स्त्रियांबद्दल आणि संपूर्ण गांधी वंशावळीबद्दल बदनामी करणारे वक्तव्य केल्याचा गंभीर आरोप न्यायालयात दाखल केलेल्या खटल्यात करण्यात आला आहे. "त्यामुळे संभाजी भिडेंकडून अनियंत्रित व बेताल वक्तव्ये" याचिकाकर्ते तुषार गांधी म्हणाले, "१ ऑगस्ट २०२३ रोजी डेक्कन पोलीस स्टेशनला तक्रार करूनही पोलिसांनी दखल घेतली नाही. पोलिसांवर राजकीय दबाव आहेत. त्यामुळे संभाजी भिडे उर्फ मनोहर कुलकर्णी हे अनियंत्रित व बेताल वक्तव्ये करतात." "भिडेंकडून ताळतंत्र न बाळगता सूर्यावर थुंकण्याचा प्रयत्न" तक्रारदारांचे वकील ॲड. असीम सरोदे म्हणाले, "एकीकडे जागतिक स्तरावरील नेत्यांना राजघाटवर महात्मा गांधींच्या समाधीवर नतमस्तक होण्यासाठी आपले पंतप्रधान घेऊन जातात. दुसरीकडे संभाजी भिडेसारखे लोक ताळतंत्र न बाळगता सूर्यावर थुंकण्याचा प्रयत्न करतात. त्यामुळे पोलिसांनी सतत समाजात विष पसरविणारी विधाने करणाऱ्या प्रवृत्तींच्या विरोधात निदान कारवाई करावी ही माफक अपेक्षा नागरिकांनी या तक्रारीतून व्यक्त केली आहे." "पोलिसांकडून सर्वोच्च न्यायालयाचाही अवमान" "डेक्कन पोलीस स्टेशनचे पोलीस निरिक्षक व पोलीस आयुक्त यांनी दखलपात्र सायबर बदनामी गुन्ह्यांची माहिती देऊनही साधी चौकशीही केली नाही. यातून त्यांनी सर्वोच्च न्यायालयाचाही अवमान केला आहे. त्यामुळे याची न्यायिक दखल घ्यावी, अशी मागणी न्यायालयाकडे करण्यात आली," अशी माहिती सामाजिक कार्यकर्ते डॉ. विश्वंभर चौधरी यांनी दिली. "भिडे आणि त्यांच्या कार्यकर्त्यांकडून सतत राष्ट्रीय व धार्मिक व्यक्तिमत्वांचा अपमान" "संभाजी उर्फ मनोहर भिडे आणि त्यांचे अनेक कार्यकर्तेही सतत राष्ट्रीय आणि धार्मिक व्यक्तिमत्वांचा अपमान करत असतात आणि अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा गैरवापर करतात. संभाजी भिडे यांनी त्यांच्या अनेक भाषणात आक्षेपार्ह आणि अपमानास्पद शब्द वापरून समाजातील अनेक लोकांचा व देशाचा अपमान केला आहे. तसेच याची उदाहरणे तक्रारीत नमूद केली आहेत," अशी माहिती याचिकाकर्त्यांनी दिली. हेही वाचा : मग महापुरुषांच्या ‘त्या’ बदनामीवर गप्प का? केसची पुढील सुनावणी २६ सप्टेंबर २०२३ रोजी भारतीय दंड संहितेच्या कलम ४९९, १५३ अ, ५०४, ५०५(२) आणि माहिती तंत्रज्ञान कायदा २००० च्या कलम ६७ आर/डब्ल्यू, फौजदारी प्रक्रिया संहिता १९९ नुसार संभाजी भिडेंविरुद्ध चौकशी होऊन गुन्हा नोंदवावा, अशी मागणी याचिकाकर्त्यांनी केली आहे. महात्मा गांधी यांचे पणतू तुषार गांधी, डॉ. कुमार सप्तर्षी, डॉ. विश्वंभर चौधरी, डॉ. मेधा सामंत, अन्वर राजन,प्रशांत कोठडीया, संकेत मुनोत, जांबुवंत मनोहर आणि युवराज शाह अशा ९ जणांनी जनतेचे प्रतिनिधी म्हणून ही तक्रार केली. त्यांच्यावतीने ॲड. असीम सरोदे, ॲड श्रीया आवले, ॲड. बाळकृष्ण निढाळकर,ॲड.बेनझीर कोठावाला व ॲड.अवंती जायले यांच्या मार्फत कलम १५६(३) सीआरपीसी नुसार खासगी फौजदारी तक्रार पुण्यातील न्यायालयात दाखल केली. या केसची पुढील सुनावणी २६ सप्टेंबर २०२३ रोजी होणार आहे.