विद्यापीठाची काही शिक्षकांवर कृपादृष्टी

नियमभंगाची पीएच.डी.

सगळे नियम मोडीत काढून पीएच.डी. वाटणाऱ्या सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाने केलेला आणखी एक चमत्कार पुढे आला आहे. विद्यापीठाशी संलग्न महाविद्यालयांतील एका शिक्षकाला पीएच.डी. होण्याआधीच ‘प्राध्यापक’ म्हणून पदोन्नती देण्यात आल्याचे समोर येत आहे. विद्यापीठाच्या अधिकारमंडळाच्या निवडणुकीतील पात्रतेसाठी हा प्रकार केल्याची चर्चा विद्यापीठात आहे.

विद्यापीठात पीएच.डी. करण्यासाठी महाविद्यालयीन शिक्षकांची नोंदणी सर्वाधिक होते. शिक्षकांना मिळणारी पदोन्नती, वेतनवाढ अशा विविध अकरा प्रकारच्या लाभांमुळे पीएच.डी. करण्याकडे शिक्षकांचा ओढा असतो. विद्यापीठाच्या अधिकार मंडळाच्या निवडणुका आणि पात्रतेचे गणितही यामागे असते. आतापर्यंत पीएच.डी. करताना नियमांचे उल्लंघन होऊनही विद्यापीठाने पदवी दिल्याचे अनेक प्रकार समोर आले आहेत. विद्यापीठाने बहुतेक सारेच नियम मोडले असल्याचे समोर येत आहे. मात्र आता त्यापुढे एक पाऊल टाकत नियम मोडून का होईना पण मिळणाऱ्या पीएच.डी.चीही वाट न पाहता शिक्षकाला प्राध्यापकपदी पदोन्नती देण्यात आल्याचे समोर येत आहे.

प्राध्यापक पदासाठी पीएच.डी. असणे आवश्यक असते. पुण्यातील अभियांत्रिकी महाविद्यालयातील एका शिक्षकाची पीएच.डी. मिळण्यापूर्वी चार दिवस आधी प्राध्यापक म्हणून घाईघाईने नियुक्ती करण्यात आली. स्थानिक निवड समितीच्या माध्यमातून एका वर्षांच्या कालावधीसाठी ही नियुक्ती करण्यात आली होती. एरवी शिक्षक मान्यतेसाठी महिनोन् महिने काढणाऱ्या विद्यापीठाने निवड झाल्याच्या दिवशीच या ‘प्राध्यापकाला’ मान्यताही देऊन टाकली. त्यावेळी विद्यापीठानेही या शिक्षकांना आपणच अद्याप पीएच.डी. दिलेली नाही, ही गोष्ट पडताळली नाही. इतकेच नाही तर नंतर स्थानिक हा शब्द वगळून नियुक्ती नियमितही दाखवण्यात आली.

पीएच.डी. करण्याच्या बोलीवर पदोन्नती

विद्यापीठात पीएच.डी. नसतानाही विभागप्रमुख, संस्थेचे संचालक म्हणून शिक्षकांच्या नियुक्त्या करण्यात आल्या आहेत. भविष्यात पीएच.डी. करू अशा बोलीवर किंवा पीएच.डी.ला प्रवेश घेतल्यानंतर आता पीएच.डी. होणारच असे गृहित धरून या नियुक्त्या करण्यात आल्याची चर्चा गेली अनेक वर्षे विद्यापीठात आहे.