पुणे : आपल्या आकाशगंगेच्या उदरात दडलेल्या एका अतिभव्य कृष्णविवराचे छायाचित्र जगभरातील खगोलशास्त्रज्ञांनी गुरुवारी जगासमोर आणले. हे कृष्णविवर पृथ्वीपासून तब्बल २७ हजार प्रकाशवर्षे दूर असल्याची माहिती खगोलशास्त्रज्ञांकडून देण्यात आली आहे. वॉशिंग्टन डी. सी. सह जगातील सहा शहरांतून एकत्रित पत्रकार परिषद घेऊन खगोलशास्त्रज्ञांनी हे छायाचित्र जगासमोर प्रसिद्ध केले.

खगोलशास्त्रज्ञांच्या मते सर्व आकाशगंगांच्या केंद्रस्थानी अशी कृष्णविवरे आहेत. तेथून प्रकाश बाहेर पडणे शक्य नसल्याने त्यांच्या प्रतिमा मिळवणे हे आतापर्यंत आव्हानात्मक होते, मात्र आंतरराष्ट्रीय संघाच्या इव्हेंट होरायझन टेलिस्कोप या जगातील आठ संक्रमित रेडिओ दुर्बिणींच्या मदतीने हे छायाचित्र मिळवणे शक्य झाल्याचे खगोलशास्त्रज्ञांनी या वेळी सांगितले.

आकाशगंगेच्या केंद्रस्थानी असलेल्या महाकाय कृष्णविवराचे हे पहिले छायाचित्र नाही. यापूर्वी एप्रिल २०१९ मध्ये पृथ्वीपासून ५३ दशलक्ष प्रकाशवर्षे दूर असलेल्या आकाशगंगेतील कृष्णविवराचे छायाचित्र या शास्त्रज्ञांच्या समूहाने जगासमोर आणले होते. त्या तुलनेत आता ज्या कृष्णविवराचे प्रकाशचित्र समोर आले आहे ती आकाशगंगा पृथ्वीपासून अत्यंत जवळ म्हणजे २७ हजार प्रकाश वर्षे एवढय़ा अंतरावर आहे. कृष्णविवर हे आपल्या सूर्यापेक्षा तब्बल चार दशलक्ष पट दाहक आणि प्रचंड असल्याचे शास्त्रज्ञांनी स्पष्ट केले आहे. त्यामुळेच त्याचा उल्लेख ‘जेंटल जायंट’ असा करण्यात आला आहे. धनु आणि वृश्चिक नक्षत्रांच्या सीमारेषेजवळ असल्याने ‘सॅगिटेरिअस ए’ असे या कृष्णविवराचे नामकरण करण्यात आले आहे. कृष्णविवरे ही आपल्याला गुरुत्वाकर्षण, सापेक्षतेचा सिद्धांत, चुंबकीय क्षेत्र अशा अनेक संकल्पनांचा अभ्यास करण्यासाठी दिशादर्शक ठरत असल्याने हे संशोधन महत्त्वाचे मानले जात आहे. अमेरिकन नॅशनल सायन्स फाउंडेशनने या संशोधनासाठी २८ दशलक्ष अमेरिकन डॉलर खर्च केले असून प्रकल्पाची एकूण किंमत सुमारे ६० दशलक्ष अमेरिकन डॉलर एवढी आहे.