पिंपरी-चिंचवड शहरातील फुगेवाडी येथे एक जीर्ण झालेली इमारत कोसळून १५ वर्षीय मुलगी इमारतीच्या ढिगाऱ्याखाली दबली होती. तिला तीन तासांच्या अथक प्रयत्नानंतर सुखरूप बाहेर काढण्यात अग्निशमन विभाग व भोसरी पोलीस यांना यश आले. या घटनेवरून देव तारी त्याला कोण मारी… या म्हणीचाच प्रत्यय आला आहे.

ही दुर्घटना आज सकाळी साडेनऊ वाजेच्या सुमारास घडली. तर या दुर्घटनेमुळे जीर्ण झालेल्या इमारतींचा प्रश्न आता ऐरणीवर आला आहे. पौर्णिमा मडके असे या दुर्घटेनतून वाचवल्या, मात्र गंभीर जखमी झालेल्या मुलीचे नाव आहे. तिच्यावर सध्या रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मडके कुटुंब राहात असलेली देवकर ही इमारत मोडकळीस आली होती. ते त्याठिकाणी भाडेतत्वावर राहात होते. १९७२ साली ती इमारत बांधण्यात आली होती. त्यामुळं इमारत जीर्ण आणि मोडकळीस झाल्याने घरमालक दुसरीकडे राहण्यास गेले होते. तसेच, मडके कुटुंबाला देखील तुम्ही दुसरीकडे राहण्यास जा असे सांगितले गेले होते. मात्र, मडके कुटुंब त्याच ठिकाणी दोन मुलींसह राहात होते.

दरम्यान, आज सकाळच्या सुमारास मडके कुटुंब राहात असलेल्या पहिल्या मजल्यावर अचानक माती पडायला लागली. हे पाहून आई आणि लहानी मुलगी घराबाहेर पडल्या. तर, वडील हे कामानिमित्त बाहेरच होते. मात्र, मोठी मुलगी पौर्णिमा ही बाथरूममध्ये असल्याने ती त्याच ठिकाणी अडकली आणि इमारत हळूहळू ढासळू लागली. घटनेची माहिती मिळताच अग्निशमन विभाग व भोसरी पोलीस तत्काळ घटनास्थळी दाखल झाले. युद्धपातळीवर बचावकार्य सुरू करत त्यांनी पौर्णिमाला तीन तासांच्या अथक प्रयत्नानंतर सुखरूप बाहेर काढलं. परंतु, तिला गंभीर दुखापत झाली असल्याने सध्या तिची प्रकृती काहीशी चिंताजनक असल्ची माहितीही सूत्रांनी दिली आहे.