पिंपरी-चिंचवड : महापालिकेकडून शहरातील विविध रस्त्यांवर ५८ किलोमीटर अंतरावर ‘सायकल ट्रॅक’ तयार करण्यात आले आहेत. मात्र, प्रत्यक्षात या सायकल ट्रॅकचा वापर वाहने उभी करण्यासाठी केला जात आहे.
पिंपरी-चिंचवड शहरात ४५ मीटर व त्यापेक्षा अधिक रुंदीच्या रस्त्यांवर स्वतंत्रपणे सायकल ट्रॅक बनविण्यात आले आहेत. ज्या ठिकाणी कमी रुंदीचे रस्ते आहेत, तेथे लाल रंगाचे पट्टे तयार करून सायकल ट्रॅक तयार करण्यात आले आहेत. शहरातील विविध रस्त्यांवर एकूण ५८ किलोमीटर अंतराचे सायकल ट्रॅक तयार करण्यात आले आहेत. हे सायकल ट्रॅक महापालिका तसेच स्मार्ट सिटी कंपनीने केले आहेत. त्यावर कोट्यवधी रुपयांचा खर्च झाला आहे, तर नव्याने ४० किलोमीटर सायकल ट्रॅकचे काम सुरू आहे. काही सायकल ट्रॅक महापालिकेने अर्बन स्ट्रीट डिझाइनच्या रस्त्यांवर केले आहेत. आणखी काही रस्त्यांवर ट्रॅक बनविण्यात येणार आहेत. परंतु, सायकल ट्रॅक एकसलग नसल्याने सायकल चालविताना नागरिकांना अनेक अडथळ्यांचा सामना करावा लागत आहे.
या ट्रॅकवर दुचाकी, चारचाकी वाहने उभी केली जातात. ट्रॅकवर मध्येच झाडे, बाके, कठडा, दिव्याचा खांब, विक्रेते, दुकानदारांचे साहित्य, राडारोडा, कचऱ्याचे ढीग, उघड्या वीजवाहक केबल, असे अनेक अडथळे आहेत. त्यामुळे सायकलस्वारांना सुरक्षितपणे सायकल चालविता येत नाही. नाइलाजास्तव सायकलस्वारांना रस्त्यावरून जावे लागते. परिणामी, सायकल ट्रॅकसाठी केलेला कोट्यवधींचा खर्च पाण्यात गेल्याचे चित्र आहे. सायकल ट्रॅक असूनही ते सायकल चालविण्यासाठी उपयुक्त ठरत नसल्याने सायकलस्वारांकडून नाराजी व्यक्त केली जात आहे.
कोणत्या रस्त्यांवर सायकल ट्रॅक?
- सांगवी फाटा ते साई चौक
- नाशिक फाटा ते वाकड
- काळेवाडी फाटा ते एमएम स्कूल
- चिंचवडगाव ते वाल्हेकरवाडी चौक
- केएसबी चौक ते कुदळवाडी
- एम्पायर इस्टेट ते ऑटो क्लस्टर चौक
- निगडी भक्ती-शक्ती चौक ते रावेत पूल
- पिंपळे सौदागर व पिंपळे गुरव, नवी सांगवी, मगर स्टेडियमजवळ आणि शाहूनगर, चिंचवड
शहरातील सायकल ट्रॅकची अवस्था गंभीर आहे. ट्रॅकवर चेंबर, फेरीवाला क्षेत्रे तयार झाली आहेत. काही ठिकाणी ट्रॅक पदपथांऐवजी रस्त्यावर आहेत. त्यामुळे ट्रॅकवर वाहने उभी केली जातात, व्यवसाय थाटले जातात. ट्रॅकवर झाडे उगवली आहेत. ट्रॅक पदपथावरच तयार करावेत. तसेच, वाहने उभी करणाऱ्यांवर कारवाई करावी, अशी मागणी इंडो ॲथलेटिक्स सोसायटीचे अध्यक्ष ॲड. गजानन खैरे यांनी केली आहे.
शहरात ५८ किलोमीटर अंतराचे सायकल ट्रॅक तयार करण्यात आले आहेत. ट्रॅकवर वाहने उभी करणाऱ्यांवर कारवाई केली जाणार आहे. सायकलस्वारांसाठीच ट्रॅकचा वापर झाला पाहिजे. त्या दृष्टीने कारवाई केली जाणार आहे, असे पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या शहरी दळणवळ विभागाचे कार्यकारी अभियंता
सुनील पवार यांनी सांगितले.
समन्वय : गणेश यादव
ganesh.yadav@expressindia.com
