scorecardresearch

पिंपरी-चिंचवड महानगर पालिका तृतीयपंथीयांना देणार पेंशन; नोकरीचीही दारं करणार खुली

तृतीयपंथीयांना दरमहा पेंशन सुरू करून पिंपरी चिंचवड महापालिकेनं सामाजिक क्रांतीचं पाऊल उचललं आहे.

तृतीयपंथीयांना दरमहा पेंशन सुरू करून दुर्लक्षित असलेल्या समाज घटकाला मुख्य प्रवाहात आणण्यासाठी पिंपरी चिंचवड महापालिकेनं सामाजिक क्रांतीचं पाऊल उचललं आहे. अशी योजना सुरू करणारी पिंपरी चिंचवड महानगरपालिका ही देशातील पहिली महानगरपालिका ठरली आहे. तृतीयपंथीय घटक हा बऱ्यापैकी समाजावर अवलंबून असतो. अशावेळी समाजानं त्यांच्या संवेदना जाणून घेतल्या पाहिजेत.

आपलं कर्तव्य समजून प्रत्येकानं उपेक्षित आणि दुर्लक्षित राहिलेल्या घटकांसाठी सामाजिक जाणिवेतून काम केलं पाहिजे. पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेनं या कल्याणकारी कामासाठी पुढाकार घेतला आहे. महापालिकेनं या समूहाला मुख्य प्रवाहात आणून स्वावलंबी बनवण्यासाठी विविध उपक्रम आणि योजना हाती घेतल्या आहेत. तृतीयपंथीयांना उतारवयात बऱ्याचदा हलाखीचं जीवन जगावं लागतं. अशावेळी त्यांना आर्थिकदृष्टया मदत करून त्यांचं जीवन सुसह्य करण्यासाठी महापालिकेने महत्वाकांक्षी योजना सुरू केली आहे.

वयाची ५० वर्षे पूर्ण केलेल्या आणि पिंपरी चिंचवड महापालिका हद्दीतील रहिवासी असणाऱ्या तृतीयपंथी व्यक्तींना आर्थिक मदत म्हणून दरमहा ३ हजार रुपये पेंशन स्वरुपात देण्यात येणार आहे. समाजातील सर्व घटकांच्या सर्वांगीण उत्थानासाठी त्यांच्या जीवनामानावर सकारात्मक परिणाम करणारी ही तृतीयपंथी पेंशन योजना असल्याचं मत आयुक्त तथा प्रशासक राजेश पाटील यांनी व्यक्त केलं.

विशेष म्हणजे, तृतीयपंथीयांना मुख्य प्रवाहात आणण्यासाठी महापालिकेनं अलीकडेच त्यांची मेट्रो सफर घडवून आणली होती. त्यांनीही सार्वजनिक वाहतुकीच्या वापर करावा, हा यामागील उद्देश होता. याशिवाय महापालिका ग्रीन मार्शल पथकामध्ये तृतीयपंथीयांची नेमणूक देखील करणार आहे. तसेच त्यांना महापालिकेच्या विविध उद्यानांमध्ये सुरक्षा रक्षकाची जबाबदारी दिली जाणार आहे. याशिवाय महापालिका हद्दीतील तृतीयपंथीयांच्या बचत गटांना व्यवस्थापन आणि बळकटीकरणासाठी अर्थसहाय्य देण्याची योजना देखील आता नव्याने सुरू करण्यात आली आहे.

मराठीतील सर्व पुणे ( Pune ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Pimpri chinchwad municipal corporation will give pensions to third gender community also will provide jobs kjp 91 rmm

ताज्या बातम्या