आगामी महापालिका निवडणुकांसाठी तयार करण्यात आलेल्या नव्या प्रभागरचनेला सर्वोच्च न्यायालयाने स्थगिती दिली असल्याने निवडणुका लांबणीवर पडणार असल्याची स्पष्ट चिन्हे आहेत. त्यामुळे ‘नगरसेवक’ होण्यासाठी आतूर असलेल्या सर्वपक्षीय कार्यकर्त्यांमध्ये प्रचंड अस्वस्थता आहे. प्रभागातील मतदारांना आकृष्ट करण्यासाठी करावा लागणारा खर्च आता झेपत नसल्याने अनेक उमेदवारांनी हात आखडता घेतला आहे.

पिंपरी पालिकेची मुदत पाच महिन्यांपूर्वीच संपुष्टात आली. करोनामुळे निर्माण झालेली परिस्थिती आणि ओबीसी आरक्षणाचा घोळ यामुळे निर्धारित वेळेत अर्थात फेब्रुवारी महिन्यात निवडणुका होऊ शकल्या नाहीत. तत्कालीन परिस्थितीत राज्यशासनाने पालिकांवर प्रशासक नियुक्त केले. त्यानंतर, प्रशासकीय राजवट पूर्ण होण्यापूर्वी निवडणुका जाहीर होतील, अशी अटकळ होती. तथापि, तसे झाले नाही. सोमवारी सर्वोच्च न्यायालयाने महापालिकांच्या प्रभागरचनेतील बदल, सदस्यसंख्येत सुधारणा आणि ओबीसी आरक्षण लागू करण्याबाबत पाच आठवडे ‘जैसे थे’ स्थिती ठेवण्याचा आदेश दिला. परिणामी निवडणुका लांबणीवर पडणार असल्याने इच्छुक उमेदवारांचा चांगलाच हिरमोड झाला आहे.

पालिका निवडणूक लढवण्यासाठी इच्छुक कार्यकर्ते गेल्या दोन वर्षांपासून तयारीत आहेत. मतदारांना खूश करण्याच्या हेतूने विविध उपक्रम राबवण्याचा इच्छुकांचा सपाटा सुरू आहे. याकरिता मोठ्या प्रमाणात खर्च केला जात आहे. मात्र, निवडणुकांच्या तारखा जाहीर होत नसल्याने आणि दैनंदिन खर्च वाढतच असल्याने इच्छुक उमेदवार वैतागले आहेत. निवडणुका नेमक्या कोणत्या महिन्यात होणार, याविषयी स्पष्टता नसल्याने इच्छुकांच्या अस्वस्थतेत भरच पडल्याचे दिसून येत आहे.

राजकीय पक्षांचे कार्यक्रमही थंडावले –

राजकीय पातळीवर असलेल्या अनिश्चिततेमुळे गेल्या काही दिवसांपासून पक्षांचे कार्यक्रमही थंडावले आहेत. निवडणुकांच्या तयारीसाठी मेळावे, सभा, मोहिमा राबवण्याबरोबरच राजकीय पक्षांनी मतदारांपर्यंत पोहोचण्यासाठी विविध उपक्रमांचे कागदोपत्री नियोजन करून ठेवले आहे. मात्र निवडणुकांच्या तारखा जाहीर होत नसल्याने प्रत्यक्ष अंमलबजावणी सुरू झालेली नाही.

निवडणुकांपूर्वीचे नेहमीचे वातावरणही दिसून येत नाही –

“ फेब्रुवारीत निवडणुका होणे अपेक्षित होते. ऑगस्ट अखेरही निवडणुकांचे चित्र स्पष्ट नाही. इच्छुक उमेदवारांना प्रभागात सक्रिय राहण्यासाठी बराच खर्च करावा लागतो. आतापर्यंत झालेला खर्चच मुळात चिंता वाढवणारा आहे. त्यात निवडणुकांच्या अनिश्चिततेची भर पडली आहे. त्याचा परिणाम म्हणजे निवडणुकांपूर्वीचे नेहमीचे वातावरणही दिसून येत नाही.” असे इच्छुक उमेदवार विनायक रणसुभे यांनी सांगितले आहे.