सव्वाशे वर्षांची परंपरा असलेल्या पुण्यातील शिक्षण प्रसारक मंडळी या शैक्षणिक संस्थेस इंग्रजी माध्यमाची शाळा सुरू करण्यासाठी पिंपरी-चिंचवड नवनगर विकास प्राधिकरणाने प्रदान केलेला भूखंड काढून घेतला आहे. संस्थेने निर्धारित तरतुदींचे पालन न केल्याने ही कारवाई केली असल्याचे प्राधिकरण प्रशासनाने स्पष्ट केले आहे.
संस्थेने ९ जानेवारी १९९६ मध्ये प्राधिकरणाकडे शाळेसाठी जागा मागितली होती. त्यानुसार, १९९७ ला दीर्घ मुदतीच्या भाडेपट्टय़ाने प्राधिकरणाचा भूखंड संस्थेस प्रदान करण्यात आला. त्या ठिकाणी संस्थेने काहीही बांधकाम केले नाही म्हणून प्राधिकरणाने वेळोवेळी नोटीस पाठवल्या. जागेचे शुल्क तातडीने भरण्यास संस्थेस सांगण्यात आले. हे प्रकरण पुढे न्यायालयातही गेले. प्राधिकरण सभेने ३१ मे २०१२ पर्यंत मुदतवाढ दिली. मात्र, संस्थेने बांधकाम सुरू न केल्याने २२ ऑक्टोबर २०१२ ला प्राधिकरणाने भूखंडाचा ताबा आपल्याकडे घेतला व एका पत्राद्वारे संस्थेस कळवण्यात आले. याचा फेरविचार करण्याची विनंती संस्थेने केली. मात्र, प्राधिकरण आपल्या भूमिकेवर ठाम राहिले.
यासंदर्भात, प्राधिकरणाचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. योगेश म्हसे यांनी यापूर्वीच आपली भूमिका स्पष्ट केली आहे. पिंपरी-चिंचवड शहरात इंग्रजी माध्यमांची शाळा सुरू करण्याची विनंती संस्थेने १९९६ मध्ये केली होती. त्यानुसार संस्थेसाठी जागा राखीव ठेवण्यात आली होती. दोन वर्षांत इंग्रजी शाळा सुरू करण्याची अट संस्थेस घालण्यात आली होती. मात्र, १३ वर्षांत त्याचे बांधकाम केले नाही म्हणून संस्थेस प्राधिकरणाने नोटीस बजावली व खुलासा मागवला होता. तो खुलासा प्राधिकरण सभेपुढे मांडण्यात आला. त्यांना मुदत वाढवून देण्यात आली होती. संस्थेने बांधकाम परवानगीबाबतच्या तरतुदींचे पालन केले नाही, अशी खात्री झाल्याने प्राधिकरणाने हे वाटप रद्द करण्याचा निर्णय घेतला, असे डॉ. म्हसे यांनी संस्थेला दिलेल्या पत्रात स्पष्ट केले होते.
संग्रहित लेख, दिनांक 11th Apr 2013 रोजी प्रकाशित
शि.प्र. मंडळीस दिलेला भूखंड पिंपरी प्राधिकरणाने काढून घेतला
सव्वाशे वर्षांची परंपरा असलेल्या पुण्यातील शिक्षण प्रसारक मंडळ या शैक्षणिक संस्थेस इंग्रजी माध्यमाची शाळा सुरू करण्यासाठी पिंपरी-चिंचवड नवनगर विकास प्राधिकरणाने प्रदान केलेला भूखंड काढून घेतला आहे.

First published on: 11-04-2013 at 02:40 IST
Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Pimpri pradhikaran withdraw land allotted to shikshan prasarak mandali