मेट्रोच्या प्रस्तावित स्कायवॉक आणि पार्किंगसाठीच  शहराचे सांस्कृतिक वैभव असलेली आणि सुवर्णमहोत्सवी वर्षांत पदापर्ण करणारी बालगंधर्व रंगमंदिराची वास्तू पाडून तेथे बहुमजली संकुल उभारण्याचा  घाट घालण्यात आल्याचे स्पष्ट झाले आहे. नियोजित मेट्रो प्रकल्पाला पूरक ठरेल अशी बहुमजली इमारत उभारण्याचे नियोजन करण्यात आल्याची माहितीही पुढे आली असून महापालिकेच्या अंदाजपत्रकामध्ये बालगंधर्व रंगमंदिराचा पुनर्विकास प्रस्तावित आहे. त्यासाठी दहा कोटी रुपयांची तरतूदही करण्यात आली आहे. पुनर्विकास करताना बालगंधर्व रंगमंदिराची जुनी वास्तू पाडण्यात येणार असून तेथे सुसज्ज अत्याधुनिक सेवांनी युक्त असे बहुमजली संकुल उभारण्यात येणार आहे. या निर्णयाचे शहराच्या सांस्कृतिक क्षेत्रात तीव्र पडसाद उमटत आहेत. बालगंधर्व रंगमंदिर पाडण्याला विरोध करण्यात येत आहे.

पुणे मेट्रो प्रकल्पाच्या पहिल्या टप्प्यातील वनाज ते रामवाडी या मार्गिकेचे काम सध्या सुरु आहे. या मार्गिकेचे एक स्थानक नदीपात्रात असून जंगली महाराज रस्त्यावरील संभाजी उद्यान येथे महाराष्ट्र मेट्रो रेल्वे कॉर्पोरेशनने स्कायवॉक प्रस्तावित केला आहे. या स्कायवॉकचे नियोजन करताना पादचारी आणि मेट्रोच्या प्रवाशांसाठी पार्किंग उपलब्ध करून देण्याचे नियोजन आहे. त्यासाठी संभाजी उद्यानातील जागेबरोबरच बालगंधर्व रंगमंदिरातील पार्किंगची जागा उपयुक्त ठरणार आहे. महामेट्रोच्या अधिकाऱ्यांनी बालगंधर्व रंगमंदिराच्या परिसरातील जागेची मागणी महापालिकेकडे केली आहे. जागेची मागणी महापालिकेकडे केल्याच्या माहितीला महामेट्रोने दुजोरा दिला आहे. जागा देण्यास महापालिकेनेही सहमती दर्शविली आहे. नियोजित स्कायवॉक आणि मेट्रो प्रकल्पाला बालगंधर्व रंगमंदिर येथील जागा पूरक ठरणार असल्यामुळेच तेथे बहुमजली संकुल उभारण्याचा घाट घालण्यात आल्याचे स्पष्ट होत आहे.

मेट्रो प्रकल्पाच्या स्वारगेट ते पिंपरी-चिंचवड आणि वनाज ते रामावाडी या दोन मार्गिका तसेच पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाचा (पुणे मेट्रोपॉलिटन रिजनल डेव्हलमेंट अ‍ॅथॉरीटी- पीएमआरडीए) मेट्रो मार्ग शिवाजीनगर येथील शासकीय धान्य गोदामाजवळ एकत्र येणार आहेत. त्यादृष्टीने फग्र्युसन रस्ता, जंगली महाराज रस्ता आणि नदीपात्रातील मेट्रोचे स्थानक यांची सांगड घालण्यासाठी स्कॉयवॉक उपयुक्त ठरणार आहे.

स्कॉयवाकॅचे नियोजन करताना पार्किंगसाठी जागा हा महत्त्वाचा मुद्दा उपस्थित झाला होता. त्यामुळे या प्रकल्पाला पूरक ठरण्यासाठी बालगंधर्व रंगमंदिरात प्रशस्त पार्किंग उभारण्यात येणार आहे. त्याचबरोबरच सुसज्ज रंगमंदिरे आणि मनोरंजनाच्या काही सुविधाही या संकुलात उपलब्ध करून देण्यात येणार आहेत.