महापालिका शिक्षण मंडळाने बेसुमार दराने कुंडय़ांची खरेदी केल्याचे उघड झाल्यानंतर आता या खरेदीबाबत शिक्षण मंडळाचे प्रमुख आणि मंडळाचे अध्यक्ष हात झटकण्याचा प्रयत्न करत असून या खरेदीला संबंधित शाळांचे मुख्याध्यापक जबाबदार असल्याचा दावा सुरू करण्यात आला आहे.
शंभर रुपयांना एक या दराने मिळणाऱ्या कुंडय़ांची खरेदी मंडळाने एक हजार रुपयाला एक याप्रमाणे केली असून या प्रकरणाची आता चौकशी सुरू झाली आहे. त्या पाठोपाठ आता वह्य़ा व कंपासपेटय़ांच्या खरेदीतील नियोजित गैरव्यवहारही बाहेर आले आहेत. खरेदीची प्रक्रिया तातडीने थांबवावी अशीही मागणी आयुक्तांकडे करण्यात आली आहे. कुंडय़ांच्या खरेदीमुळे मंडळाचे प्रमुख व अध्यक्ष अडचणीत आल्यामुळे आता संबंधितांकडून हे सर्व प्रकरण मुख्याध्यापकांवर उलटवण्याचा प्रयत्न सुरू झाला आहे.
कुंडय़ांच्या खरेदीचा स्पष्ट लेखी आदेश शिक्षण प्रमुखांनी काढला होता व त्याच आदेशाचे पालन मुख्याध्यापकांना करावे लागले. कुंडय़ांचा दर व पुरवठा करणारा ठेकेदार या गोष्टींची निश्चिती शिक्षण मंडळाचे अध्यक्ष व शिक्षण प्रमुखांनीच केलेली होती. मुख्याध्यापकांनी फक्त मंडळाने दिलेल्या आदेशाचे पालन केले. मात्र, दहापट जादा दराने केलेल्या खरेदीचे हे प्रकरण उघड झाल्यानंतर आता या खरेदीला मंडळ नाही, तर मुख्याध्यापकच जबाबदार असल्याचा दावा मंडळातर्फे केला जात आहे. संबंधित ठेकेदाराकडून कुंडय़ांची खरेदी मुख्याध्यापकांनी केलेली आहे. तो त्यांचा निर्णय आहे, असा पवित्रा मंडळाने घेतला असून तसा खुलासा मंडळातर्फे महापालिका आयुक्तांकडेही करण्यात आल्याचे समजते.
खरेदीतील गैरव्यवहार उजेडात आल्यानंतर जर आता मुख्याध्यापकांना जबाबदार धरण्याचा प्रयत्न केला जाणार असेल, तर ते सहन केले जाणार नाही. त्याबाबत आम्ही आयुक्तांना पत्र देणार असून खरेदीला शिक्षण मंडळच जबाबदार आहे आणि तसा आदेश मंडळानेच काढला होता, ही बाब यापूर्वीच स्पष्ट झाली आहे.
अरविंद शिंदे
विरोधी पक्षनेता
संग्रहित लेख, दिनांक 30th Apr 2014 रोजी प्रकाशित
मुख्याध्यापकांना जबाबदार धरण्याचा मंडळाचा प्रयत्न
आता या खरेदीबाबत शिक्षण मंडळाचे प्रमुख आणि मंडळाचे अध्यक्ष हात झटकण्याचा प्रयत्न करत असून या खरेदीला संबंधित शाळांचे मुख्याध्यापक जबाबदार असल्याचा दावा सुरू करण्यात आला आहे.

First published on: 30-04-2014 at 02:55 IST
Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Pmc education board plant pot corruption