महापालिकेने कचरा प्रक्रियेचे काम दिलेल्या हंजर या कंपनीचे काम अत्यंत अकार्यक्षमतेने सुरू असतानाही या कंपनाला पन्नास ऐवजी तीनशे रुपये प्रतिटन या दराची बक्षिसी मंजूर करण्यात आली आहे, तर दुसरीकडे हंजर कंपनी योग्यप्रकारे काम करत नसल्यामुळे महापालिका कर्मचाऱ्यांवर कचरा वर्गीकरणाच्या कामाची सक्ती करण्यात आली आहे. संतापजनक बाब म्हणजे आवश्यक साहित्य न देताच हे काम त्यांच्याकडून जबरदस्तीने करवून घेतले जात आहे.
उरुळी येथे जमा होणाऱ्या कचऱ्यावर प्रक्रिया करण्याचे काम महापालिकेने हंजर या कंपनीला कराराने दिले आहे. करारानुसार कंपनीने रोज एक हजार ते अकराशे टन कचऱ्यावर प्रक्रिया करणे बंधनकारक असले, तरी कंपनीच्या अकार्यक्षमतेमुळे रोज तीनशे ते चारशे टन कचऱ्यावरही प्रक्रिया होत नाही अशी परिस्थिती असल्याचे महापालिका अधिकाऱ्यांकडूनच वेळोवेळी सांगितले जात आहे. त्यामुळे आता महापालिकेनेच स्वत:चे कर्मचारी कंपनीला पुरवले आहेत.
कंपनीकडून अशा प्रकारचा कारभार चालू असतानाही कंपनीला प्रतिटन जो दर दिला जातो, त्यात सहापटींनी वाढ करण्याचा निर्णय गेल्या आठवडय़ात महापालिकेच्या मुख्य सभेत घेण्यात आला. त्यानुसार हा दर आता प्रतिटन तीनशे रुपये झाला आहे. त्यातील काही रक्कम भविष्यातील कामाची आगाऊ रक्कम म्हणून देण्यात आली आहे आणि दुसरीकडे कंपनीबरोबरचा करारही रद्द करण्यासाठीची कार्यवाही सुरू आहे.
हंजरच्या या असमाधानकारक कामाचा फटका महापालिका सेवकांना बसत असून कंपनीच्या प्रकल्पात कचरा जात नसल्यामुळे फार मोठय़ा प्रमाणावर कचरा साठून राहिला आहे. त्यामुळे महापालिकेतील कायम तसेच हंगामी सेवकांना कचरा वर्गीकरणाच्या कामाची सक्ती करण्यात आली आहे. सध्या साठलेला तसेच गोळा होत असलेला सर्व कचरा हातांनी ओला व सुका या पद्धतीत वेगळा करण्याच्या या सक्तीमुळे सेवकांच्या हातांना इजा होत असल्याच्या अनेक तक्रारी आल्या आहेत. विशेषत: कचऱ्यात येत असलेलय फुटक्या बाटल्या, काचा, सुया, लोखंडी साहित्य आदींमुळे जखमा होत असल्या, तरीही रबरी हातमोजे वा अन्य कोणत्याही साहित्याशिवाय सेवकांना हे काम करावे लागत आहे. या सक्तीच्या विरोधात महापालिका कामगार युनियनतर्फे सर्व क्षेत्रीय कार्यालयांसमोर निदर्शने केली तसेच आयुक्तांची भेट घेऊन काही मागण्याही सादर केल्या.
कचऱ्याचे ओला व सुका या पद्धतीने वर्गीकरण झालेच पाहिजे. एकत्र झालेला कचरा वेगळा करण्याचे काम कोणतीही साधने न देता सेवकांकडून सक्तीने करवून घेतले जात आहे. एकत्र केलेला कचरा सेवक उचलणार नाहीत. ते काम कंपनीचे आहे. तसेच खासगी कंपनीच्या कचरा प्रकल्पावर महापालिकेचे जे सेवक पाठवण्यात आले आहेत ते देखील परत बोलावून घेतले पाहिजेत.
– मुक्ता मनोहर
सरचिटणीस, महापालिका कामगार युनियन
संग्रहित लेख, दिनांक 27th Feb 2014 रोजी प्रकाशित
हंजरला दरवाढीची बक्षिशी; पालिका कर्मचाऱ्यांना शिक्षा
महापालिकेने कचरा प्रक्रियेचे काम दिलेल्या हंजर या कंपनीचे काम अत्यंत अकार्यक्षमतेने सुरू असतानाही या कंपनाला पन्नास ऐवजी तीनशे रुपये प्रतिटन या दराची बक्षिसी मंजूर करण्यात आली आहे.

First published on: 27-02-2014 at 03:20 IST
Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Pmc garbage classification hanjer urali